वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथी सोहळ्याला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनाही निमंत्रण
आष्टी प्रतिनिधी :
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाला दिशा देणारे थोर संत, श्रेष्ठ कीर्तनकार व समाजप्रबोधक श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या सुवर्ण पुण्यतिथी सोहळ्याचे भव्य व ऐतिहासिक आयोजन श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे करण्यात आले असून, या सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती सोहळ्याचे प्रमुख आयोजक ह.भ.प. विठ्ठल महाराज यांनी दिली.
या पुण्यतिथी सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही औपचारिक निमंत्रण देण्यात आले आहे, त्यामुळे हा सोहळा राज्यासह देशपातळीवर लक्ष वेधणारा ठरणार आहे.
३ ते १० जानेवारीदरम्यान सुवर्ण महोत्सवी सोहळा
संत वामनभाऊ महाराज यांच्या ५० व्या पुण्यतिथीनिमित्त ३ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत आठ दिवस चालणारा भव्य धार्मिक, आध्यात्मिक व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गहिनीनाथगड परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, महाराष्ट्रासह इतर राज्यांतूनही लाखो भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
कीर्तन, प्रवचन, पारायण व महायज्ञाचे आयोजन
या पुण्यतिथी सोहळ्यात दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
यामध्ये —
काकडा आरती
हरिपाठ
ज्ञानेश्वरी पारायण
अभंग गाथा
हरिकीर्तन व प्रवचन
नामस्मरण
भजन-कीर्तन
५१ कुंडात्मक हरिहर महायज्ञ
असे अनेक भक्तिपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, संत-महंत व वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
१० जानेवारी रोजी सुवर्ण कळसाचा ऐतिहासिक क्षण
या सुवर्ण महोत्सवातील विशेष आकर्षण म्हणजे १० जानेवारी २०२६ रोजी मंदिराच्या शिखरावर शुद्ध सोन्याचा कळस बसविण्याचा भव्य धार्मिक सोहळा. हा सोहळा संत वामनभाऊ महाराजांच्या भक्तांसाठी ऐतिहासिक व अविस्मरणीय ठरणार आहे.
संत वामनभाऊ महाराजांचे समाजप्रबोधनात्मक कार्य
संत वामनभाऊ महाराज यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातून समाजातील अंधश्रद्धा, चुकीच्या रूढी व दांभिकतेवर प्रहार केला. भक्ती, सेवा, समानता व मानवतेचा संदेश देत त्यांनी वारकरी संप्रदाय अधिक व्यापक केला. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही लाखो भाविकांच्या जीवनावर दिसून येतो.
भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
या सुवर्ण पुण्यतिथी सोहळ्याच्या आयोजनाबाबत ह.भ.प. विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून, भाविकांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संत वामनभाऊ महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



stay connected