आष्टीचा नुमान शेख गाजविणार सौराष्ट्र गुजरातचे क्रिकेट मैदान
विद्यापीठ झोन राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
आष्टी प्रतिनिधी- आष्टी तालुक्यातील साबलखेड येथील शेख नुमान निसार या खेळाडूने आपल्या अष्टपैलू खेळाचे बहारदार प्रदर्शन करत क्रिकेटचे अनेक मैदान गाजवलेले आहे. भारताच्या सौराष्ट्र गुजरात येथे होणाऱ्या विद्यापीठ झोन राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी नुकतीच नुमान शेख याची निवड झाली असून या निवडीबद्दल त्याचे आष्टी तालुक्यात अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
मागील वर्षीही नुमान शेख याची कोटा (राजस्थान) येथे विद्यापीठ झोन इंडिया क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली होती. त्यावेळी ही नुमान शेख याने कोटा राजस्थान क्रिकेटचे मैदान आपल्या अष्टपैलू खेळाचे बहारदार प्रदर्शन करत गाजवले होते.
साबलखेड येथील सर्वसामान्य कुटुंबातील शेख नुमान निसार यांने प्रचंड मेहनत करून अल्पावधीतच क्रिकेट खेळात एक आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आष्टी, बीड, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, अहिल्यानगर, नाशिक, पुणे यासह कोटा (राजस्थान) यासह अनेक ठिकाणी चौकार षटकारांची अतिषबाजी करत तसेच भेदक गोलंदाजी करत अष्टपैलू खेळाचे बहारदार प्रदर्शन करत मोठ्या प्रमाणावर मैदान गाजवलेले आहे.
प्रशिक्षक प्रा डॉ संतोष वनगुजरे व रहीम शेख यांचे मार्गदर्शन नुमान शेख याला लाभत आहे.
नुमान शेख यांच्यासह या संघात हंबर्डे महाविद्यालय आष्टी येथील तुषार खवळे व अभय पाटील यांची ही निवड झाली आहे. शनिवार दि 24 जानेवारी 2026 रोजी गरवारे क्रिकेट मैदान छत्रपती संभाजीनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर क्रिकेट संघात निवड झाली असून सौराष्ट्र विद्यापीठ राजकोट (गुजरात) येथे दिनांक 26 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, गोवा या राज्यासह देशातले अनेक राज्य सहभागी होणार आहेत. या क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून डॉ बी डी हंबर्डे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ संतोष वनगुजरे यांची निवड झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली हा संघ रविवार दि 25 जानेवारी रोजी क्रिकेट स्पर्धा खेळण्यासाठी राजकोट येथे रवाना होणार आहे. या संघास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, क्रीडा संचालक डॉ. सचिन देशमुख, कुलसचिव डॉ.अमृतकर, आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे, माजी आमदार बाळासाहेब आजबे, माजी आमदार साहेबराव दरेकर, तसेच आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष किशोर नाना हंबर्डे, सचिव अतुल मेहेर, डॉ.गणेश पिसाळ, दिलीप वर्धमाने, डॉ.गायकवाड, प्रा. महेश चवरे, सुभान शेठ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे, उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब मुटकुळे, प्रा. अविनाश कंदले, कार्यालयीन अधीक्षिका श्रीमती जाधव यांनी अभिनंदन केले.



stay connected