गायरान जमिनीवरील सोलर प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; म्हसोबाचीवाडीकरांची न्यायाची मागणी
आष्टी (बीड) | प्रतिनिधी
स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांचे लाडके गाव म्हणून ओळख असलेले आणि भारतीय जनता पक्षाला कायमस्वरूपी १०० टक्के मतदान करणारे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील म्हसोबाचीवाडी येथे गायरान जमिनीवर सुरू असलेल्या सोलर प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. ग्रामस्थांचा विरोध असतानाही हा प्रकल्प सध्या सुरू असल्याने गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
या सोलर प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांच्या वतीने आतापर्यंत मा. तहसीलदार, मा. जिल्हाधिकारी, नामदार पंकजाताई मुंडे तसेच मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याची भावना ग्रामस्थांमध्ये आहे.
सध्या गावातील सुमारे ३० टक्के लोक ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेलेले आहेत. तसेच रोज पिकअप, ट्रॅक्टरद्वारे जवळपास ३० टक्के लोक रोजगारासाठी बाहेरगावी जात-येता करतात. अशा परिस्थितीत गायरान जमिनीवर सोलर प्रकल्प उभारण्यात आल्यास गावातील शेतकरी व पशुपालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या प्रकल्पामुळे गाय, शेळ्या, बैल, म्हैस यांसारखी जनावरे पाळण्यासाठी आवश्यक असलेली चराईची जागा नष्ट होणार आहे. तसेच शेतात जाण्यासाठी असलेले रस्ते, पाईपलाईन टाकणे, पाण्याची व्यवस्था यावरही गंभीर परिणाम होणार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
म्हसोबाचीवाडीतील ग्रामस्थांनी तमाम महाराष्ट्रातील सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रश्नाकडे लक्ष वेधून महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री यांच्यापर्यंत हा विषय पोहोचावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गायरान जमिनीवर सुरू असलेला हा सोलर प्रकल्प तात्काळ बंद करून ग्रामस्थांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी म्हसोबाचीवाडी ग्रामस्थांनी केली आहे.


stay connected