श्रृंगेरीदेवीकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था; दोन दिवसांत दुरुस्तीची मागणी, आंदोलनाचा इशारा
आष्टी प्रतिनिधी
आष्टी - श्रृंगेरीदेवी व मुगगाव–श्रृंगेरीदेवी हे दोन्ही प्रमुख रस्ते गेल्या दोन वर्षांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता अशोक पोकळे (चिंचाळा) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी दि. १७ डिसेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २, आष्टी येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर केले आहे.
श्रृंगेरीदेवी येथील यात्रा ही तालुक्यातील सर्वात मोठी जत्रा असून यावर्षी पौष पौर्णिमेला दि. ५ जानेवारीपासून यात्रेला सुरुवात होणार आहे. अमावस्येपर्यंत सलग १५ दिवस चालणाऱ्या या यात्रेदरम्यान आष्टी, पाटोदा तालुक्यांसह राज्यभरातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात. मात्र, सध्याच्या रस्त्यांच्या अवस्थेमुळे भाविक व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
आष्टी व मुगगावकडून श्रृंगेरीदेवीकडे जाणाऱ्या मार्गांवर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून साईडपट्ट्या पूर्णपणे वाहून गेल्या आहेत. त्यामुळे दुचाकी, चारचाकी तसेच पायी जाणाऱ्या भाविकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. आष्टी–मुगगाव हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कंत्राटदारांसाठी “चराईचे कुरण” ठरत असल्याची तीव्र नाराजी ग्रामस्थांमध्ये असल्याचा आरोपही पोकळे यांनी केला आहे.
नव्याने रस्ता झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच पुन्हा खड्डे पडतात. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून केवळ तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी केली जाते; मात्र काही दिवसांतच रस्त्यांची अवस्था पूर्ववत होते, अशीही माहिती निवेदनात देण्यात आली आहे.
आगामी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यांची पाहणी करून सर्व खड्डे भरावेत, वाहून गेलेल्या साईडपट्ट्या दुरुस्त कराव्यात व सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत येत्या दोन दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास ग्रामस्थांच्या सहकार्याने आंदोलन छेडण्याचा इशाराही सामाजिक कार्यकर्ता अशोक पोकळे यांनी दिला आहे.


stay connected