धानोरा–नगर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थ व व्यावसायिक त्रस्त; तातडीने उपाययोजनेची मागणी

 

धानोरा–नगर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थ व व्यावसायिक त्रस्त; तातडीने उपाययोजनेची मागणी




आष्टी तालुक्यातील धानोरा ते नगर या महत्त्वाच्या रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून नागरिकांना लवकरच चांगल्या रस्त्याची सुविधा मिळणार आहे. मात्र, धानोरा गावाच्या हद्दीत रस्त्यालगत नव्याने करण्यात आलेल्या नाल्याच्या शेजारी मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थ, व्यापारी व वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.



या खड्ड्यांमुळे रस्त्यालगत असलेल्या विविध दुकाने, हॉटेल्स व व्यवसायिक ठिकाणी ग्राहकांना ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. दुचाकी व चारचाकी वाहने थांबवताना अडथळे निर्माण होत असून अनेक वेळा वाहन घसरून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी योग्य प्रकाशव्यवस्था नसल्यामुळे हे खड्डे लक्षात न आल्याने नागरिक जखमी होण्याच्या घटना घडत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
व्यावसायिकांचे म्हणणे आहे की, ग्राहकांना दुकानदारांकडे पोहोचणे अवघड होत असल्याने व्यवसायावरही याचा थेट परिणाम होत आहे. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचून खड्डे अधिक खोल झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर धानोरा ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित ठेकेदाराकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. रस्त्याचे काम सुरू असले तरी नाल्याच्या शेजारील खड्ड्यांमध्ये तात्काळ मुरूम टाकून ते बुजवावेत, तसेच रस्ता कडेला सुरक्षित ये-जा करण्यासाठी तात्पुरती व्यवस्था करावी, अशी ठाम मागणी नागरिक व व्यावसायिकांकडून होत आहे.
वेळीच योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर मोठे अपघात होण्याची शक्यता असून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी अपेक्षा धानोरा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.