आष्टी तालुक्यात तरुण पिढी रंगली 'फुलचंद पाना'त तरुणांच्या आरोग्याला मोठा धोका पानात नशेली रासायनिक पदार्थ नशायुक्त पान आष्टी तालुक्यात पानटप-यांवर खुलेआम विक्री कारवाई करणार कोण?

 आष्टी तालुक्यात तरुण पिढी रंगली 'फुलचंद पाना'त तरुणांच्या आरोग्याला मोठा धोका
पानात नशेली रासायनिक पदार्थ 
नशायुक्त पान आष्टी तालुक्यात पानटप-यांवर खुलेआम विक्री कारवाई करणार कोण?







लोक म्हणतात एक बाटली पचतेय पण पान नाही, खाल्लकी किक बसते


(निसार शेख)

आष्टी प्रतिनिधी -

पूर्वी प्रत्येकाच्या घरी पान खाण्यासाठी पानडब्बे असायची यामध्ये कात, चुना वापरुन साधे पान खायचे. परंतु अलीकडच्या काळात सध्या तालुक्यातील गावखेड्यापासून शहरापर्यंत तरुणाई मध्ये 'फुलचंद पान' खाण्याचा नवीन ट्रेंड आला असून मोठ्या प्रमाणावर नशायुक्त पान खाण्याची क्रेझ तरुणांमध्ये वाढत चालल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात गावागावात सर्रास पानटप-यांवर खुलेआम नशायुक्त पानाची विक्री होत आहे. तर या पानांमध्ये सुगंधी सुपारी, कात, चुना अन् अज्ञात नशीली रासायनिक पदार्थ बेसुमार मिसळले जाते असल्याने एक पान खाल्याने एका 'बाटली'ची नशा येते असे पान खाणारे सांगत आहेत. याचा दुष्परिणाम कोणी गुंग होतय, कोणी डोक धरतय, मळमळ, घाम फुटतो, उलट्या, चक्कर येणे अशा समस्या जाणवत आहेत. पहिल्यांदा पान खानारा तर विचारुच नका तो परत नावपण घेणार नाही इतकी बेजारी होतेय.अन् सवय लागली की तरुणाई आहारी जात आहे. नियमित सेवन केल्यास गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सर्वत्र प्रशासनाच्या नाकावर टिच्चून फुलचंद पानांची खुलेआम विक्री होत आहे. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नसल्याने तरुण पिढी आहारी जात असल्याचे आष्टी तालुक्यातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. तर अन्न औषध प्रशासन व पोलीस प्रशासन नेमके करते तरी काय? असा संतप्त सवाल तालुक्यातील जनतेतून उपस्थित केला आहे.



गावखेड्यापासून शहरांपर्यंत सगळीकडे सध्या सर्व शाळकरी मुले तरुण, नागरीकांमध्ये फुलचंद पानाची क्रेझ निर्माण झाली आहे. फुलचंद, पंचरत्न, नवरत्न व 120, 300 बनारस व कलव हे नशेली पानांचे प्रकार आहेत. या पानांमध्ये नशेली पावडर टाकली जाते असा संशय अनेकांनी व्यक्त केला असून याच्या एका पानात दारूच्या बाटली इतकी नशा आहे. हे फुलचंद पान  खाणारे तरुण सांगत आहेत. या पानांमध्ये किमाम व तंबाखू वापरली जाते.  किमाम तोंडात फिरतोय तस् खाणारा पण फिरतोय.

पानात कोलीन आणि तंबाखूत निकोटीन असल्याने 

 सहन नाही झाले तर छातीत दुखायला लागते. यामुळे कॅन्सर चा धोका वाढतो दात दुखणे, हिरड्या सुजणे, यासह अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे.आजकाल फुलचंद खाल्ले की चक्कर येऊन जमिनीवर बसायला लावतात. आता पानटपरी वाले पण सगळ्यांना एकच प्रकारे कडक बनवलेले पान देतात अगोदर मागितल्यानंतर पान बनवायचे. सर्व एकदाच बनवून दिले जाते पण ज्याला झेपत नाही तो 'तारे मोजतोय' खायला मज्जा वाटते पण एकदा सवयी लागली की लागली की दररोज आहारी जातोय. या फुलचंद पानामध्ये एक विशिष्ट प्रकारची सुस्ती, नशा आणि धुंदी येणारा गांजासारखा पदार्थ मिसळून त्याची विक्री केली जात असल्याचे अनेकजण सांगतात. हे पान खाण्यासाठी शहरी भागांतील अल्पवयीन मुलांसह ग्रामीण भागांतील मुलांमध्ये क्रेझ असल्याचे पाहायला मिळत आहे. काही विद्यार्थीही या पानामुळे व्यसनाधीन झालेले दिसत आहे. या नशायुक्त ' फुलचंद पाना'ची अगोदर १० रूपये व आता १५ रुपये इतकी किंमत असल्याची माहिती मिळत आहे. एखाद्या तरुणाने पहिल्यांदा हे पान खाल्ले तर त्याला मळमळ, उलट्या व चक्कर येते. तर विडा खाणाऱ्या तरुणांच्या पालकांना केवळ मुलाने पानच खाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तो पालकांच्या नजरेतून वाचत चालला आहे.

_________



आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम 
फुलचंद या नशायुक्त पानांचे पहिल्यांदाच जर एखाद्याने सेवन केले तर तो त्याला मळमळ, उलट्या आणि चक्कर येण्याचे प्रकार घडत आहेत. मात्र, नंतर या पानाची चटक लागल्याने त्याच्या शरीरावर दुष्परिणाम होतो. नियमित सेवन केल्यास इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. 
________

अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

आजकाल 'फुलचंद पाना'ची क्रेझ वाढत असून पान खाल्ले की यापासून दुष्परिणाम होताना दिसत आहेत. भविष्यात याचा धोका वाढू नये तरुणांच्या ऊज्वल भविष्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने माहिती घेऊन त्वरित कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र प्रशासनाकडून कारवाईची बडगा उगारला जात नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासन या प्रश्नांवर गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे  अन्न आणि औषध प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

________



कारवाई कधी ?
 पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन या बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. गुटखा, तंबाखू, सिगारेट यावर जशी बंदी आदेश लागू आहे, तशीच कठोर कारवाई नशायुक्त पानावर केली जावी. तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात असूनही, प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नाही हेच दुर्दैव म्हणावे लागेल. त्यामुळे संबंधित विभागांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.