आष्टी तालुक्यात अवैध धंद्यांचा धुमाकूळ; पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांत संताप
-------------------
राजेंद्र जैन / कडा
---------------
आष्टी तालुक्यात पोलीस प्रशासनाच्या नाकावर टिचून मटका, जुगार, गुटखा, दारू, वाळू तस्करी यांसारखे अवैधधंदे दिवसेंदिवस फोफावत आहेत. या बेकायदेशीर धंद्यांतून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत असून, स्थानिक पोलिस मात्र फक्त हाताची घडी तोंडावर बोट ठेवून अर्थपूर्ण मौन बाळगत असल्याचे चित्र दिसत आहे.
आष्टी तालुक्यात अनेक ठिकाणी पोलिसांचं अप्रत्यक्ष अभय मिळत असल्याने अनेक ठिकाणी बेकायदेशीर धंदे जोमात असून, लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. काही अधिकृत व अनधिकृत एजंटांकडून हप्ते गोळा केले जात असल्याची चर्चा सर्वत्र आहे. काही ठिकाणी हे एजंट खुलेआम वावरत आहेत. लक्ष्मी भक्तांना वरिष्ठांचे अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी अवैध धंदे बंद करण्याचे ठाणेदारांना स्पष्ट आदेश दिले असतानाही, हेच आदेश त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून केराच्या टोपलीत फेकले जात असल्याचे वास्तव समोर आले आहे.
प्रत्येक महिन्याला ‘मलिदा’ गोळा करून वरिष्ठांना खुश ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाठराखण होत असताना, प्रामाणिक व इमानदार पोलिस कर्मचाऱ्यांची मात्र उपेक्षा केली जात आहे. या सर्व प्रकारामुळे आष्टी तालुक्यातील सामाजिक वातावरण दूषित झाले असून, गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी मिळत आहे. या अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर शिस्तभंगात्मक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. बेकायदेशीर अवैध धंद्यांची हप्तेखोरी बंद करून सामाजिक स्वास्थ अबाधित ठेवावे. अशी मागणी सामाजिक संघटना करीत आहेत.
------%%-------
कडा चौकीचे अधिकारी कागदावर ?
----------------
आष्टी तालुक्यातील कडा पोलीस चौकी अंतर्गत तेवीस गावे असून 40 ते 45 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. या ठिकाणी एक अधिकारी आणि सहा पोलीस कर्मचारी असले तरी येथील सपोनि हे आष्टीवरूनच कागदी घोडे फिरवण्याचे काम पाहतात. त्यामुळे अवैद्य धंद्यावर कोणाचं नियंत्रण आहे की नाही, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
-----%-------


stay connected