‘आलं आभाळ भरून’ कवितासंग्रह अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमात
शिरूर कासारः
येथील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. विठ्ठल जाधव यांच्या ‘आलं आभाळं भरून’ या बालकुमार कवितासंग्रहाची निवड पीएमश्री, समग्र शिक्षा योजना अंतर्गत शालेय ग्रंथालयांसाठी इयत्ता अकरावी आणि बारावीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या या कवितासंग्रहाचा समावेश सन-२०२५ पासून होत आहे.
डॉ.विठ्ठल जाधव हे तीस वर्षांहून अधिक काळ जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. बालसाहित्य विषयात पीएच्.डी पदवी प्राप्त असून त्यांच्या ‘पांढरा कावळा’ या बालकादंबरीस महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार (२०१२) लाभला आहे. बटाटीची धार (बाल कथासंग्रह), तिवढा, रानरांगूळ हे कथासंग्रह, गर्भकळा कवितासंग्रह, उंदरीन सुंदरीन आणि अटर का पटर हे दोन बालकविता संग्रह प्रकाशित आहेत. यासह मानवता व्हाऊचर लेखसंग्रह, एकविसाव्या शतकारंभीचे बालसाहित्य हा संशोधनपर समीक्षा ग्रंथ अशी दहा पुस्तके प्रसिद्ध आहेत. बालकुमार साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नियतकालिके, आकाशवाणीवर साहित्य लेखनास स्थान मिळाले आहे.
‘आलं आभाळ भरून’ हा डॉ. जाधव यांचा कवितासंग्रह शासकीय शाळा, आश्रमशाळा यांमधून अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत मोफत अभ्यासता येणार आहे. निसर्ग, शेतीमाती, सामाजिक प्रश्न सोबतच देशभक्ती, वर्तमान समाजजीवन या विषयीच्या रचना या संग्रहात आहेत. या निवडीसाठी डॉ. जाधव यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.


stay connected