" बिबट्या व मनुष्य यांच्या मधील संघर्ष "
****************************
आजच्या एकविसाव्या शतकात संपूर्ण मानवी जीवनच अनिश्चित होत चालले आहे कधी काय होईल व कधी कोणते संकट येईल हे आज कोणालाही सांगता येणार नाही.बऱ्याच वेळा काही दुर्घटना घडल्याचे आपण ऐकतो कुठे भूकंप येतो,कुठे चक्री वादळ येते,कुठे वीज पडते,कुठे महापूर येतो,डोंगराचे कडे कोसळतात तर कुठे गारपीट होते या घटनांमध्ये अनेक माणस जखमी होतात अनेक जण मृत्युमुखीही पडतात,पाळीव जनावरांचे ही काही प्रसंगी मरण ओढवते,राहती घरे पडतात,शेतातल्या उभ्या पिकांचा नाश होतो,स्थावर व जीवित मालमत्ताचे प्रचंड नुकसान होते लोकांचे सगळं दैनंदिन जीवन विस्कळीत होते व ते पूर्ववत होण्यासाठी पुढील अनेक दिवस लागतात खरं तर कुठलीही आपत्ती म्हणजे आलेले महाभयानक संकटच,हे आपत्तीरुपी संकट कुठे व कोणत्या स्वरूपात येईल त्याने कोणाचे किती व कसे नुकसान होईल हे सांगता येत नाही अशा अचानक येणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित,आर्थिक हानी होते. या वर्षी तर महाराष्ट्रावर बिबट्या या हिंस्र प्राण्यांची दहशत पसरली आहे.देशात व राज्यात वन्य प्राण्यांसाठी अनेक ठिकाणी जंगले आरक्षित केलेली आहेत,महाराष्ट्रात ताडोबा व सातारा महाबळेश्वर च्या जावळी खोऱ्यात वाघ व बिबटे आढळतात,आंबोली च्या घाटात विविध प्रकारचे साप संरक्षित केले आहेत,नायगाव ला मोरासाठी मयूर अभय अरण्य आहे. महाराष्ट्र्रातील विविध जंगलात अनेकविध प्रकारच्या वन्य जीवांचे वास्तव्य आहे.
परंतु मागील काही वर्षांपासून मराठवाड्यात, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात जंगलातील आपले वास्तव्य सोडून शिकार करून खाण्यासाठी व पाण्याच्या शोधार्थ अनेक रानडुकरे,कोल्हे,लांडगे,तरस, काळवीट,हरीण,बिबट्या व वाघ या वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढू लागला आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.शेतातील उभे पीक नष्ट करणे,शेतकरी,लहान मुले व महिला यांच्यावर हल्ला करणे प्रसंगी त्यांचा जीव घेणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत.
मागील काही महिन्यांपासून आष्टी पाथर्डी तालुक्याच्या सीमेवर गर्भगिरी च्या डोंगर पट्टयात, सह्याद्री च्या डोंगर रांगेत बिबट्या या हिंस्र प्राण्यांचा मोठया संख्येने वावर सुरू झाला आहे. पूर्वी कधीतरी एखादा बिबट्या कुठल्यातरी जंगल प्रवन भागात आढळला अशी बातमी यायची परंतु आज महाराष्ट्रातील विविध ग्रामीण व शहरी भागात बिबट्या चे दर्शन होते आहे. काही ठिकाणी तर बिबटे झुंडीने फिरताना दिसत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक इतके बिबटे महाराष्ट्रात कसे आले याचा ही शोध घेणं आवश्यक आहे. एक चर्चा अशीही होते आहे की महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या गुजरातच्या जंगल भागातून या बिबट्यानी महाराष्ट्राच्या विविध भागात वावर सुरु केला आहे.वन्य प्राणी अभ्यासक च्या मते सगळेच बिबटे नरभक्षक नसतात. साधारण बिबट्याचे आवडते खाद्य कुत्रे, वासरु, गायी व इतर वन्य प्राणी असतात पण सध्या आढळून येणारे बिबटे मनुष्यावर मोठ्या प्रमाणावर हल्ले करताना दिसून येत आहेत. मुळात बिबट्या हा प्राणी मोठा चपळ असतो तो शिकार करताना दबा धरून बसतो व शिकार त्याच्या टप्यात आली की एका क्षणात झडप घालून शिकार करतो तो साधारण त्याच्या उंचीच्या समकक्ष शिकार करतो त्यामुळंच खाली बसलेल्या किंवा वाकून काम करणारे माणसं व लहान मुलाना तो आपले लक्ष बनवतो. बिबट्या या प्राण्याचे एक वैशिष्ट्य असे की एकदा शिकार करून त्याने खाल्ली की तो परत पुढील तीन दिवस तो कोणतीही शिकार करत नाही कारण त्याने भक्षण केलेले मांस त्याला तीन दिवस पुरते. बिबट्या दोनशे किलो वजन घेऊन सहज कुठल्याही झाडावर चढू शकतो एवढी शारीरिक ताकत त्याच्यात असते तो साधारण दिवसभरात दोनशे किलोमीटर अंतर सहज पार करू शकतो. बिबट्या या प्राण्याचा एक उग्र असा वास येतो तो दोनशे फुटावरून जरी गेला तरी आसपास तो वास पसरतो परंतु सर्वसामान्य लोकांना तो कळत नाही. प्राण्यांच्या क्षेत्रात काम करणारे व वन विभागाच्या लोकांना तो वास लक्षात येतो. मादी बिबट्याची प्रजनन क्षमता पण मोठी आहे एका वेळेला ती चार पिलाना जन्म देती हे ही एक मोठे कारण त्यांची संख्या वाढण्याचे आहे.
एकतर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अतिपाऊस व वादळामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे,दर वर्षी येणाऱ्या काही ना काही नैसर्गिक आपत्तीमुळे तो मानसिक तणावात आहे आणि आता च्या परिस्थितीत तोंडाशी आलेल्या पिकाला पाणी देणे गरजेचं आहे,फवारणी करणे आहे,पीक कापणी आहे त्यासाठी शेतात रोज जाणं आवश्यक आहे पण आज या बिबट्या च्या दहशतीमुळे हे पीक हातातून निघून जाते की काय अशी त्याची अवस्था झाली आहे. महाराष्ट्रातील सगळाच ग्रामीण भाग बिबट्याच्या दहशती खाली आला आहे. एकट्या अहिल्या नगर, नाशिक व जुन्नर या भागात हजारो बिबटे फिरत आहेत तेच बिबटे हळहळू इतर भागात जात आहेत कारण इतक्या बिबट्याना एकाच भागात खाद्यसाठी शिकार मिळणे शक्य नाही त्यामुळेच ते प्राणी व मनुष्यावर मोठ्या प्रमाणावर हल्ले करत आहेत.
शासनाच्या वन विभागाने या नरभक्षक बिबट्याना पकडण्यासाठी विशेष पथक नेमून शोध मोहीम राबविण्याचे सुरू केलेले आहे पण अजून तरी हे हिंस्त्र बिबटे पकडण्यात यश आलेले नाही.एकतर महाराष्ट्रात वन विभाग अंतर्गत डोंगर व जंगले मोठ्या प्रमाणात आहेत पण त्या प्रमाणात वन विभागाकडे मनुष्य बळ कर्मचारी वर्ग नाही. अनेक वन विभागातील कर्मचारी जागा रिक्त आहेत त्यांच्या कडे बिबटे पकडायचे पिंजरे जास्त नाहीत वन विभागाकडे कर्मचाऱ्यांना फिरण्यासाठी गाड्या नाहीत त्यामुळे त्यांना ही काम करताना मर्यादा येत आहेत. याचाही शासनाने विचार करणे गरजेचे आहे.आपल्या देशात वन्य जीव संरक्षण कायदा लागू आहे त्यानुसार प्रत्येक प्राण्यांना त्यांच्या जीवाचे सरंक्षण मिळालेले आहे,वन्य जीवांची शिकार होऊ नये उलट त्याचे संवर्धन व्हावें हा त्यामागील हेतू आहे.परंतु त्यातील काही वन्य जीव हिंस्त्र होऊन मनुष्याच्या जीवावरच उठत असतील तर त्यांना पकडण्यापेक्षा मारणे आवशयक आहे,त्यादृष्टीने प्रशासनाने तात्काळ पाऊल उचलणे गरजेचे आहे किंबहुना आणखी जीवितहानी टाळण्या
साठी ते महत्वाचं आहे. महाराष्ट्र सरकारने आताच बिबट्या मुळे आलेल्या या संकटाला राज्य आप्पती म्हणून घोषित केले आहे. सुप्रीम कोर्टानेही बिबट्याची पैदास आणखी वाढू नाही म्हणून त्यांची नसबंदी करायला परवानगी दिली आहे परंतु मुळात प्रश्न हा आहे की नसबंदी कशी करता येईल त्यासाठी इतके हजारोच्या संख्येने असलेले बिबटे कसे पकडता येतील याचा ही विचार होणे गरजेचे आहे. काल एक बातमी अशी आली की बिबट्याना शिकारी साठी बोकड व कोंबड्या जंगलात सोडण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जर खरंच असा काही निर्णय झाला असेल तर त्याने काहीच साध्य होणार नाही किती दिवस शासन त्यांना हे शिकारी साठी पुरवू शकेल निव्वळ मूर्खपणा असलेला निर्णय ठरेलं तो अस म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही.
मानवाने निसर्ग नियम तोडून जंगलावर अतिक्रमण करण्याचा कायम प्रयत्न केला म्हणून तर हे वन्य प्राणी जंगले सोडून मानवी वस्त्या वर हल्ले तर करत नसतील ना? याचा ही समाजाने, सरकारने विचार करणे आवश्यक आहे. शेवटी मनुष्य असो वा कोणताही प्राणी निसर्गाने सर्वाना आपल्या जगण्याचा समान हक्क दिला आहे.म्हणूनच अशा या विचित्र अवस्थेतून आपल्या सगळ्यांची सुटका होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शासन स्तरावर अनेक ठोस उपाययोजना करून मनुष्य व बिबट्या यांच्या मधील संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करावा लागेल हे मात्र निश्चित....!!

stay connected