*गांधी जयंती विसरली का? तालुक्यातील शासकीय यंत्रणांचा निष्काळजीपणा उघड!*
दौलावडगाव तेजवार्ता न्युज...
२ ऑक्टोबर हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती म्हणून हा दिवस देशभर साजरा केला जातो. परंतु यंदा दौलावडगावसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये हा राष्ट्रीय दिन फारच उदासीनतेने पार पडल्याचे चित्र दिसले.
ग्रामपातळीवर असलेल्या जिल्हा परिषद शाळा, निमशासकीय शाळा, हायस्कूल, आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, तसेच इतर शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये फक्त एक-दोन शिक्षक, कर्मचारी किंवा शिपायांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडले. काही ठिकाणी तर कार्यक्रम घेण्यातच आले नाहीत. दसरा सणाच्या सुट्टीचे कारण देत अनेक संस्थांनी हा राष्ट्रीय दिन साजरा करण्याचे टाळले.
या घटनेमुळे गावकऱ्यांत तीव्र नाराजीचे वातावरण आहे. राष्ट्रीय दिनांकडे केलेल्या या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांची देशभक्ती आणि जबाबदारी किती आहे, यावर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. देशाचे राष्ट्रपिता गांधीजी यांच्या विचारांचा विसर आज आपल्या शासकीय यंत्रणेलाच पडत चालला का, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
स्थानिक समाजसेवक रामु भैय्या कोहक, दीपक भैय्या फसले, आणि अल्ताफ मन्यार यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की,
गांधी जयंती ही केवळ सुट्टी नव्हे, ती देशभक्ती जागवणारा दिवस आहे. शासकीय आणि शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे अपेक्षित असते. मात्र यंदा निष्काळजीपणा स्पष्ट दिसला. याबाबत वरिष्ठांनी चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, राष्ट्रीय दिनांच्या साजरीकरणात शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि सहभाग सक्तीचा असायला हवा. अन्यथा अशा दिवसांचे महत्व कमी होऊन पुढील पिढी देशभक्तीच्या मूल्यांपासून दुरावेल.
गांधी जयंतीसारख्या दिवसाकडे दुर्लक्ष करणे हे केवळ शासकीय शिस्तीचे उल्लंघन नाही, तर राष्ट्रभावनेलाही धक्का आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
stay connected