दौलावडगावात आपत्ती टळली – एपीआय मंगेश साळवे यांची तत्परता ठरली जीवनदायी
दौलावडगाव प्रतिनिधी:
दौलावडगाव परिसरात आज संभाव्य आपत्ती टळली असून याचे श्रेय जाते अंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय श्री. मंगेश साळवे तसेच श्री. शिरसाट व श्री. पैठणे यांना. त्यांच्या प्रसंगावधानामुळे आणि तात्काळ निर्णयक्षमतेमुळे गावातील नागरिकांना मोठ्या संकटातून सुटका झाली.
गावातील तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने पाणी ओव्हरफ्लो होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे, तलावाच्या सांडपाण्याची योग्य व्यवस्था नसल्याने आसपासच्या घरांना व शेतांना पाण्याचा धोका वाढत चालला होता. परिस्थिती गंभीर होत चालल्याचे व्हिडिओ जागरूक नागरिकांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर तसेच तेजवार्तानेही या संबंधी वृत्त प्रसिद्ध केले होते .प्रशासनाचे लक्ष या घटनेकडे गेले.
ही माहिती मिळताच, एपीआय श्री. मंगेश साळवे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीसारखी यंत्रसामग्री उपलब्ध नसतानाही त्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने स्वतः पुढाकार घेतला आणि पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे तलावातील पाणी कमी करण्यात यश आले आणि परिसरातील अनेक कुटुंबांना संभाव्य नुकसानीपासून वाचविण्यात आले.
श्री. मंगेश साळवे यांचे हे कार्य केवळ पोलिसी कर्तव्यापुरते मर्यादित नसून ते सजग, जबाबदार आणि लोकहितैषी नागरिकाचे उदाहरण ठरते.
स्थानिक नागरिकांनी या अधिकाऱ्यांच्या कार्याचे मनापासून कौतुक केले असून, “समाजहितासाठी स्वतः झोकून देणाऱ्या अशा अधिकारीवर्गाला मन:पूर्वक सलाम आहे,” अशा भावना व्यक्त केल्या.
stay connected