*दौलावडगाव व केळ परिसरातील तलाव फुटण्याचा धोका; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण!*
दौलावडगाव वार्ताहर
आष्टी तालुक्यातील मौजे दौलावडगाव गावातील तलाव क्रमांक ३ (केळ व दौलावडगाव शिवारातील पाझर तलाव) या तलावाला सांडच (सांडवे) नसल्यामुळे नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या तलावाची रचना करताना मूलभूत तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले असून, सांडवे न ठेवता तयार केलेल्या या तलावासाठी जबाबदार असणाऱ्या पाटबंधारे विभागातील अभियंत्यांचा "विशेष सन्मान" करावा, अशी उपरोधिक प्रतिक्रिया स्थानिक शेतकरी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.
हवामान खात्याने दिलेल्या रेड अलर्टनुसार शनिवारी रात्रीपासून सतत जोरदार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे तलाव जलाशय पूर्ण क्षमतेने भरला असून, सध्या फक्त दोन फुट इतकीच मोकळी जागा उरली आहे. दिवसभरात पाऊस असाच कायम राहिल्यास तलाव फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तलावाखालील सुमारे सहा ते सात घरांची वस्ती या भागात आहे. या वस्तीत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण आहे. १५ सप्टेंबर रोजी झालेल्या पुराच्या भीषण अनुभवामुळे ग्रामस्थ अद्याप सावरले नाहीत, आणि आता पुन्हा पावसाचा धोका समोर असल्याने लोक रात्रभर जागरण करत आहेत. "रात्री घरातील प्रत्येक व्यक्ती एकामागून एक जागी राहून पाणी पाहत असतो," असे स्थानिक ग्रामस्थ सांगतात.
ग्रामस्थांनी ग्रामसभेत सरपंच यांना कल्पना दिली.१५ सप्टेंबरपासूनच पाटबंधारे विभाग, महसूल विभाग आणि गृह विभाग यांना वारंवार दूरध्वनीद्वारे परिस्थितीची कल्पना दिली आहे. परंतु, आजतागायत कोणत्याही अधिकाऱ्याने घटनास्थळी भेट दिलेली नाही, अशी तक्रार नागरिकांनी केली.
stay connected