पूराच्या संकटातही सरपंचांचा जागर — गावकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी रात्रभर पहारा

 *पूराच्या संकटातही सरपंचांचा जागर — गावकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी रात्रभर पहारा!*



दौलावडगाव वार्ताहर...

  केळ ता. आष्टी मागील १५ सप्टेंबर रोजी झालेल्या अतीवृष्टीमुळे केळ गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी घुसले, शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भीषण अनुभवामुळे गावकरी अजूनही भयभीत होते. दरम्यान, २७ सप्टेंबर रोजी हवामान खात्याने बीड जिल्ह्यासह परिसरासाठी रेड अलर्ट जाहीर केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.



या परिस्थितीत, आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस यांचे कट्टर समर्थक व केळ ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच श्री. सचिन सुदाम दळवी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रात्रभर पावसात तळ ठोकून गावकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली.

सरपंच दळवी यांनी तलावाच्या भिंतीवरील पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले, गावकऱ्यांना सतत माहिती देत राहिले. रात्रभर ओल्या कपड्यांत आणि थंड वातावरणात त्यांनी केलेली ही धडपड गावकऱ्यांच्या जीव रक्षणासाठी अत्यंत मोलाची ठरली.



यावेळी सरपंचांसोबत गावातील तरुण कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात तलाव परिसराची तपासणी केली आणि कोणताही धोका ओढवू नये म्हणून सतत पहारा ठेवला.

या कार्याबद्दल सरपंच सचिन दळवी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि ग्रामस्थांनी त्यांच्या धाडसी वर्तणुकीचे कौतुक करत आपत्तीच्या काळात अशी लोकाभिमुख नेतृत्वाची भावना खऱ्या अर्थाने ग्रामपातळीवरील लोकसेवेचे दर्शन घडवते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.