मराठवाड्यात अतिवृष्टीने हाहाकार : बळीराजा हतबल, मायबाप सरकारकडे मदतीची याचना
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत झालेल्या अवकाळी पावसाने व अतिवृष्टीमुळे भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज अक्षरशः कोलमडून पडला आहे. पुराच्या पाण्याने केवळ शेतकऱ्यांचे पीकच नाही, तर संसारच वाहून गेला आहे.
उभी पिकं आडवी झाली, गाई-म्हशी डोळ्यादेखत वाहून गेल्या, संसार उद्ध्वस्त झाला. गुरं-ढोर वाचवण्यासाठी मायेचं हृदय फाटून निघालं. लेकराबाळांपेक्षा जपलेली पिकं, वर्षानुवर्षे काबाडकष्टाने उभं केलेलं घरकुल—सगळं एका क्षणात पुराच्या पाण्यात गिळंकृत झालं.
शेतकरी बांधावर उभा राहून हतबल झालेला दिसतोय. ढसाढसा रडत तो फक्त एकच प्रश्न विचारतोय—“काय दोष आमुचा?”. निसर्गाचा हा आघात आता सहन होईना. अश्रूंच्या पुरातच मोडलेला संसार वाहून चालला आहे.
आज जगाला अन्न देणारा पोशिंदा स्वतः रस्त्यावर आला आहे. सरकारच्या दारी आर्त हाक मारत आहे. “मायबाप सरकार, राजकारण चुलीत गेलं तरी चालेल, पण आमच्या संसाराला वाचवा… आम्हाला पुन्हा उभं करा.” अशी त्याची करुण विनंती आहे.
पूरस्थितीने हतबल व गंजलेला बळीराजा आज खऱ्या अर्थाने मदतीची याचना करत आहे. त्याच्या मदतीला धावून जाणं हीच खरी वेळ आहे. अन्यथा आयुष्यभराच्या घामाचा सडा टाकून, जगाला जगवणारा हा शेतकरी स्वतः मात्र संपून जाईल
stay connected