NEWS Live Report – बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त, ओला दुष्काळ जाहीर करण्याची तातडीची मागणी

 NEWS Live Report – बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्ध्वस्त, ओला दुष्काळ जाहीर करण्याची तातडीची मागणी




बीड :

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, ६५ मि.मी. पेक्षा अधिक पाऊस एका दिवसात पडला, तर त्याला "अतिवृष्टी" मानले जाते. मात्र बीड जिल्ह्यात फक्त एका दिवसात तब्बल १९८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ही परिस्थिती किती भीषण आहे हे यावरून स्पष्ट होते.




या अतिवृष्टीने जिल्ह्यातील शेती पिकांचे अक्षरशः नुकसान करून टाकले आहे. सोयाबीनला कोंब फुटू लागले आहेत, कापूस झोपून गेला असून त्याची वाढ खुंटली आहे, उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांद्याचे भुसारे आणि संपूर्ण पिके वाहून गेली आहेत. ऊस पिक झोपल्यामुळे त्याचे पुनरुज्जीवन कठीण झाले आहे. शिवाय, भाजीपाला आणि इतर हंगामी पिके पूर्णपणे सडून गेली आहेत.



शेतकऱ्यांच्या संसार उघड्यावर पडले असून, अनेकांचे धान्य कोठारे आणि जनावरांचे चारा वाहून गेला आहे. ही परिस्थिती ‘ओल्या दुष्काळा’पेक्षा कमी नाही, तर त्याहून भयावह आहे.


बीड जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार तसेच शेतकरी संघटनांनी शासनाकडे तातडीने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसायचे असतील, तर पंचनाम्याचे तुणतुणे वाजवण्यापेक्षा आणि कागदपत्रांचे खेळ खेळण्यापेक्षा, सरकारने तातडीने सरसकट मदत जाहीर करून दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी जिल्हावासीयांकडून होत आहे.



शेतकऱ्यांचा विश्वास आहे की शासनाने वेळीच मदत केली, तर त्यांचा उद्ध्वस्त संसार उभा राहू शकतो. मात्र, विलंब झाल्यास आत्महत्यांचा धोका नाकारता येणार नाही.

सध्या बीड जिल्ह्यातील शेतकरी प्रशासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहेत.


👉 जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या या आक्रोशाला शासनाने तातडीने प्रतिसाद देऊन ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, हेच आजचे बीड जिल्ह्याचे ज्वलंत मागणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.