शिक्षणाचा वटवृक्ष – कर्मवीर भाऊराव पाटील
समाजाच्या अंध:कारमय आकाशात शिक्षणाचा सूर्य उगवून सर्वदूर प्रकाश पसरवणारे नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. त्यांनी समाजासाठी केलेली कार्ये म्हणजे ज्ञानाची पेरणी, संस्कारांची लागवड आणि स्वावलंबनाचे झाड रोवणे. त्यांच्या परिश्रमाने उगवलेला हा शिक्षणाचा वटवृक्ष आजही लाखो-कोटोंच्या जीवनाला सावली व आधार देत आहे.
कोल्हापूर जिल्यात हातकणंगले नावाचा तालुका आहे. या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर,भव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे. या गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी (आश्विन शुद्ध पंचमी, ललिता पंचमी) कर्मवीरांचा जन्म झाला.
भाऊरावांचे बालपण गरिबीत गेले. परंतु, संकटांना डोळसपणे सामोरे जात “माणूस घडवायचा असेल तर शिक्षण द्या” ही अखंड ज्योत त्यांच्या मनात तेवत राहिली. समाजातील बहुजन, शेतकरी, कामगार व वंचित घटकांना शिक्षणापासून वंचित ठेवणारी परिस्थिती त्यांनी जवळून पाहिली होती. म्हणूनच त्यांनी “असत्याशी लढा, अज्ञानाशी झुंज” या ब्रीदवाक्याने शिक्षणरूपी क्रांती घडवली.
त्यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेने हजारो शाळा, महाविद्यालये उभारली. गरीब शेतकरी विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा आणि शिका’ ही योजना म्हणजे अंध:कारातला दीपस्तंभच ठरली. स्वतः श्रम करून, स्वतः कष्ट करून शिक्षण घेता येते, हे त्यांनी जगासमोर दाखवून दिले.
भाऊरावांचे कार्य म्हणजे फक्त शिक्षणपुरते मर्यादित नव्हते; ते म्हणजे समाजमनाची मशागत. अज्ञानाच्या कड्यावर उभ्या असलेल्या वंचित जनतेला त्यांनी ज्ञानरूपी पंख दिले. त्यांनी घडवलेली माणसं म्हणजे संस्कारांचा गंध पसरवणारी फुले, परिश्रमाची शिकवण देणारी फळे आणि आत्मविश्वासाने उभी राहणारी झाडे.
आजही ग्रामीण भागात एखादे शाळा-महाविद्यालय दिसले की, त्या पाठीशी उभा राहिलेला कर्मवीरांचा कणा जाणवतो. त्यांच्या विचारांचे बीज रुजवले म्हणूनच आज शिक्षणाचा वटवृक्ष हिरवागार वटलेला आहे.
कर्मवीरांचे जीवन म्हणजे न संपणारी प्रेरणागाथा. त्यांनी घडवलेली शिक्षणक्रांती म्हणजे समाजासाठी उभारलेले मंदिर. त्यांच्या कार्यामुळे वंचितांच्या डोळ्यात स्वप्न फुलले, आणि हातात भविष्याचा नकाशा आला.
थोडक्यात, कर्मवीरांचे आयुष्य म्हणजे ज्ञानाची उपासना, शिक्षणाची साधना आणि समाजाची प्रबोधनयात्रा. त्यांचा शिक्षणाचा वटवृक्ष हेच त्यांच्या कार्याचे जिवंत स्मारक आहे.कारण महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.
९ मे १९५९ रोजीचा तो दिवस होता.कर्मवीरांचा जीवनदीप विझला...पण रयतेसाठी कर्मवीरांचा ज्ञानदीप विझला असे म्हणता येणार नाही. कारण खरे पाहता ते विझणं नव्हतं; ते होतं विश्वभर प्रकाशाचे पसरलेले किरण बनणे.
त्यांच्या जाण्याने समाजाने एक द्रष्टा हरवला, तरी त्यांचे विचार ज्ञानगंगेच्या प्रवाहासारखे अखंड वाहत राहिले.
त्यांचा मृत्यू म्हणजे एका सूर्यास्ताचा सोहळा...कारण सूर्य मावळतो खरा, पण त्याच्या किरणांची लाली आकाशभर पसरते,तशीच कर्मवीरांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी त्यांच्या विचारांच्या स्मृतींनी आजही उजळलेली आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते....
जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.
stay connected