अनुसूचित जमातीच्या धर्तीवर भोई व भटक्या ब समाजाला घरकुलासह इतर सोई सुविधा मिळाव्यात
राळेगाव तहसीलदार व गटविकास अधिकारी मार्फत मा.मुख्यमंत्री यांना निवेदन
सुनील शिरपुरे/यवतमाळ
महाराष्ट्र प्रदेश भोई समाज सेवा संघाचे अध्यक्ष मारोतराव पडाळ यांचे नेतृत्वात राळेगाव तालुक्यातील भोई व भटक्या ब प्रवर्गात येणा-या सर्व समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळण्याकरीता व घरकुलाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मा.तहसीलदार साहेब व मा.गटविकास अधिकारी साहेब राळेगाव यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. सद्या राळेगाव तालुक्यातील भोई तथा भटक्या जमातीच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीचा भोई समाज संघटनेच्या वतीने केलेल्या सर्वेअंती भोई तथा भटका ब प्रवर्ग अतिशय अविकसित असल्याचे निदर्शनास आले. भोई व भटक्या ब प्रवर्गात येणा-या समाजाला शैक्षणिक, आर्थिक व राजकीय आरक्षण नाही, शिक्षणामध्ये सवलती नाही, नोक-या नाही, उद्योगधंदे नाही आणि राहायला घर नाही. त्यामुळे भोई तथा भटका ब प्रवर्गात असणारा सर्व समाज मोठ्या प्रमाणात असून तुटपुंज्या २.५ टक्के आरक्षणामुळे अविकसित आहे. त्यामुळे तालुक्यातील भोई तथा सर्व भटक्या ब प्रवर्गातील समाजाच्या वतीने मा.तहसीलदार साहेब राळेगाव यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. तसेच राळेगाव तालुक्यातील भोई तथा भटक्या ब प्रवर्ग पंतप्रधान मोदी आवास योजना किंवा यशवंतराव चव्हाण घरकुल योजना व इतर कोणत्याही घरकुल योजनेअंतर्गत घरकुलापासून वंचित आहेत. भोई तथा भटका समाज नदी नाल्याच्या काठावर गावाच्या बाहेर राहत असून अतिशय पडक्या अवस्थेत असणा-या घरात वास्तव्य करीत आहे. पडक्या अवस्थेतील एका एका छोट्या घरात अनेक कुटुंबे एकत्र राहत असून जंगली जनावरे व नैसर्गिक आपत्तीला सामोरे जात वास्तव्य करीत असल्याने व मागील काही अनेक वर्षांपासून झाडगाव येथील भोई समाज वस्तीचे पुनर्वसन प्रलंबित आहेत. तर ते त्वरित मंजूर करून सोई सवलती मिळण्याबाबत मा गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये प्रलंबित घरकुलाचे प्रश्न व झाडगाव येथील भोई समाज वस्तीचे पुनर्वसन त्वरीत मंजूर करावे, अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. या शिष्टमंडळात भोई समाज संघटनेचे अध्यक्ष मारोतराव पडाळ, हनुमानजी सातघरे, अशोकराव पारीसे, युवा अध्यक्ष राहुल पडाळ, सुनील पारीसे, दिनेश पारिसे, अनंता पारीसे, समीर डोंगरे, गोविंदराव बावणे, चंदाबाई पचारे व बेलदार समाजाचे अध्यक्ष श्री जयाभाऊ रागीनवार उपस्थित होते.
stay connected