आमदार सुरेश धस ॲक्शन मोडमध्ये : कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

 *आमदार सुरेश धस ॲक्शन मोडमध्ये : कृष्णा मराठवाडा प्रकल्पाला गती देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक* 



*ता.१३ , आष्टी (प्रतिनिधी) :* आष्टी विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी भाग कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या कृष्णा मराठवाडा प्रकल्प – उपसा सिंचन योजना क्र. ३ (खुंटेफळ साठवण तलाव) या महत्त्वाकांक्षी योजनेच्या भूसंपादन व पुनर्वसन प्रक्रियेस गती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी मा. श्री. विवेक जॉन्सन यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.



या बैठकीत आमदार सुरेश धस यांनी थेट आघाडी घेत ॲक्शन मोडमध्ये काम करताना संबंधित विभागांना ठोस निर्देश दिले. त्यांनी खुंटेफळ, कुंभेफळ आणि सोलापुरवाडी या बुडीत क्षेत्रांचे भूसंपादन तातडीने पूर्ण करणे, गावठाण मोजणी व बाधित घरांचे मूल्यांकन करून पुनर्वसनाची प्रक्रिया गतीमान करणे, कृषी व स्थापत्य घटकांची संयुक्त मोजणी करून कलम १९ ची कार्यवाही पूर्ण करणे तसेच सोनाळवाडी व बर्गेवाडी येथील बुस्टर पंपगृहांसाठी भूसंपादनाचे काम प्राधान्याने करणे या मुद्द्यांवर ठोस भूमिका मांडली.


आमदार धस म्हणाले, “सन २००९ मध्ये माझ्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या योजनेला मान्यता मिळाली. उजनी जलाशय–शिंपोरा ते खुंटेफळ साठवण तलाव थेट पाईपलाईनचे काम सुरू असून, या प्रकल्पामुळे अंदाजे १० हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे मतदारसंघ कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होईल. अधिसूचना जानेवारी २०२६ पर्यंत वाढवली असली तरी कामे प्रलंबित राहू नयेत. संबंधित विभागांनी भूसंपादन व पुनर्वसनाची सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत.”


तसेच या बैठकीत सिंदफणा प्रकल्पाची उंची वाढवणे, सिंदफणा व्हॅलीतील प्रलंबित साठवण तलावांची कामे, नगरपंचायत व वन विभागातील जमीन हस्तांतरण, नायगाव राष्ट्रीय मयूर अभयारण्यात वृक्षतोड व पर्यटन सुविधा, पैठण-पंढरपूर महामार्गावरील मावेजा, मच्छिंद्रनाथ गड विकास आराखडा, अहिल्यानगर-बीड-परळी रेल्वे मार्गावरील अडचणी, शिरूर तालुक्यातील अतिवृष्टीबाबत विमा तक्रारी, सौर व पवन ऊर्जा प्रकल्पांमुळे निर्माण झालेले प्रश्न, शहीद जवानांच्या कुटुंबीयांना शेतीयोग्य जमीन वाटप तसेच ७/१२ दस्त नोंदीची प्रलंबित कामे अशा विविध मुद्द्यांवरही जिल्हाधिकाऱ्यांबरोबर सकारात्मक चर्चा झाली.



या बैठकीस लाभक्षेत्र अधीक्षक अभियंता सिंगाडे, कार्यकारी अभियंता घुगे, उपविभागीय अधिकारी श्रीमती शेख, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) धुमाळ, निवासी उपजिल्हाधिकारी स्वामी, नगररचनाकार जाधव, उपअधीक्षक भूमि अभिलेख विभाग आष्टी तसेच महसूल, सिंचन व भूसंपादन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.