पोलीस, गावकरी एकीमुळे गावावरचं संकट टळलं
-------------------
संभाव्य धोका ओळखून धरणातील पाण्याला वाट काढून दिली
--------------------
राजेंद्र जैन / कडा
--------------------
लोणी परिसरात ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाल्यामुळे या भागातील सटवाई धरण ओव्हरफ्लो झाले. या धरणाला सांडवा नसल्याने धरणं फुटेल की काय म्हणून म्हणुन ग्रामस्थ अक्षरश: भयभीत झाले होते. संभाव्य धोका ओळखून अंभोरा पोलिसांसह गावकऱ्यांनी एकत्रितपणे तब्बल चार तास भर पावसात परिश्रम घेऊन यंत्राच्या साह्याने धोक्याची पातळी ओलांडलेल्या या धरणाच्या पाण्याला एका बाजूने सांडवा तयार करुन वाट काढून दिली. पोलिस आणि गावकरी एकजुटीमुळे गावावर मोठं संकट टळलं, असंच म्हणावं लागेल.
आष्टी तालुक्यात मागील आठवड्यात अतिवृष्टीमुळे ओढे, नाले, नद्यासह सगळे तलाव ओव्हरफ्लो झाले. सर्वत्र शेती पाण्याखाली गेली, संसार पुराच्या पाण्यात वाहून गेले, जनजीवन विस्कळीत झाले. या भयावह परिस्थितीत तालुक्यातील लोणी येथील सटवाई धरण क्षमतेपेक्षा अधिक भरले. त्यातच धरणाला सांडवाच नसल्याने ग्रामस्थ अक्षरश: भयभीत झाले होते. संभाव्य धोका ओळखून अंभोरा पोलीस ठाण्याचे सपोनि मंगेश साळवे, पोलिस अंमलदार शिवदास केदार, सतीश पैठणे, अमोल शिरसाठ व इतर कर्मचाऱ्यांसह लोणी येथील गावकऱ्यांनी एका विचाराने एकत्रित चर्चा करून तब्बल चार तास भरपावसात परिश्रम घेऊन यंत्राच्या साह्याने धोक्याची पातळी ओलांडलेल्या या धरणाच्या पाण्याला सांडवा तयार करुन वाट काढून दिली. त्यामुळे पोलिस, गावकऱ्यांच्या एकीमुळे गावावरचं भयंकर असं संकट टळलं. कुठल्याही संकटावर एकत्रित लढा दिल्यास, त्या संकटावर सहज मात करता येते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे पोलिस, ग्रामस्थांनी एका गावाप्रती दाखवलेला एकोपा आहे.
--------%%%-------
stay connected