सकलेन सय्यदची समाज कल्याण निरीक्षकपदी निवड
कडा (प्रतिनिधी )- आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू सकलेन सय्यद याने स्पर्धा परीक्षामध्ये देखील आपल्या यशाचा डंका कायम ठेवला असून तीन वेगवेगळ्या पदावर यशाची हॅट्रिक केली आहे . समाज कल्याण निरीक्षक या पदावर त्याची निवड झाली आहे.
आष्टी तालुक्यातील केरूळ येथील रहिवासी आणि कडा येथील अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळाच्या विविध विद्याशाखाचा विद्यार्थी असलेला सकलेन जमीर सय्यद हा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू आहे. खेळाबरोबर शैक्षणिक क्षेत्रातही त्याने उल्लेखनीय काम केले आहे. अर्थशास्त्र विषयात एमए ही पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर तो नेट व सेट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. इतकेच नाही तर त्याची पीएचडी देखील सुरू आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना त्याने आदिवासी विभागात वरिष्ठ सहाय्यक तर महिला व बालविकास विभागात बाल संरक्षण अधिकारी या पदावर यश मिळवले होते. आता नुकत्याच जाहीर झालेल्या समाज कल्याण विभागाच्या सरळ सेवा परीक्षेत देखील सकलेन याने यश मिळवले असून समाज कल्याण विभागात समाज कल्याण निरीक्षक या पदावर त्याची निवड झाली आहे. त्याच्या या तिहेरी यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
stay connected