कडा पोलीस चौकीचे तात्कालीन सपोनि भाऊसाहेब गोसावी यांनी जपले माणुसकीचे नाते
कडा येथील २५ पूरग्रस्त कुटुंबांना दिले किराणा किट
आष्टी: प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील कडा येथे मागील आठ दिवसात दोन वेळेस महापूर आल्याने गावामध्ये पाणी शिरून अनेक कुटुंबाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. यामध्ये संसारउपयोगी साहित्यासह अन्नधान्य ही पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मोठे संकट उभे राहिले आहे.या संकटात मदत म्हणून कडा पोलीस चौकीला दोन वर्षांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून असलेले भाऊसाहेब गोसावी यांनी पंचवीस कुटुंबांना किराणा किटचे वाटप करून माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
आष्टी तालुक्यातील कडा येथे दिनांक १५ व २२ सप्टेंबर रोजी कडी नदीला अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात महापूर आला होता. या महापुराने नदीकाठच्या अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी घुसले.त्यामुळे संसार उपयोगी साहित्यासह अन्नधान्य ही यापुरामध्ये वाहून गेले.आपण जिथे कर्तव्य बजावले तिथे फुल ना फुलाची पाकळी मदत म्हणून सध्या सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी पंचवीस कुटुंबांना किराणा किट देऊन माणुसकीचे दर्शन घडवले. आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो तेथील लोकांचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून व गोसावी यांचे कडा शहराशी असलेले ऋणानुबंध पाहता 200 किलोमीटरवर सध्या ड्युटी करणारे गोसावी यांनी माणुसकीचे नाते जपत पूरग्रस्तांना आधार देण्याचे काम केले. या किराणा किटचे माजी सभापती संजय ढोबळे ,माजी सरपंच अनिल तात्या ढोबळे, पत्रकार रघुनाथ कर्डिले,अन्सार सय्यद,महेश घोलप यांनी त्या कुटुंबांना घरी जाऊन किराणा किटचे वाटप केले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी गोसावी यांचे कौतुक केले आहे.
stay connected