सोनं झालं लाखाचं 'तोळा'; चोरांचा वस्त्यांवर 'डोळा'
--------------------
निमगावचोभात सोन्या- चांदीचा 60 हजाराचा ऐवज लांबविला
--------------------
राजेंद्र जैन / कडा
------------------
तालुक्यातील निमगावचोभा परिसरातील गिऱ्हे वस्तीवर अज्ञात चार चोरट्यांनी घरातील व्यक्तींना मारहाण करून सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह साठ हजाराचा ऐवज लुटून चोरट्यांनी पलायन केल्याची घटना शुक्रवार दि. 22 रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
पोलीस सूत्रांकडून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील निमगावचोभा येथे गिऱ्हे वस्तीवर शुक्रवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास सतीश नवनाथ गिऱ्हे यांच्या घराचा कडीकोंडा उघडून अज्ञात चार चोरट्यांनी घरातील व्यक्तींना मारहाण करीत चार ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, साडेतीन ग्रॅमचे डोरले व चांदीचे पैंजण असा एकूण पन्नास ते साठ हजाराचा ऐवज लुटून चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडली. घरफोडी झाल्याची माहिती मिळताच सपोनि विजय नरवडे, पोकॉ भाऊसाहेब आहेर, नंदकिशोर सवाशे, अमोल नवले, सरकारी वाहनचालक प्रताप घोडके यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत चोरट्यांनी पलायन केले होते. याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध आष्टी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि नरवडे करीत आहेत. घटनास्थळी बीडच्या श्वान पथकासह अंगुली निर्देश तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.
-------%%--------
सध्या चोरट्यांनी शेतातील वस्त्यांना लक्ष केले असून, हे चोरटे घरातील सामान उचकण्याऐवजी महिलांच्या अंगावरील दागिने ओरबडतात. घरात महिलांच्या अंगावर तोळाभर का होईना सोने असतेच, सध्या सोन्याला लाखाचा भाव झाला. त्यामुळे चोरटे शेतवत्यांना लक्ष करताना दिसत आहेत.
--------%%------


stay connected