पहिल्या गायीच्या ऋणातून शेतकऱ्याने उभारली बंगल्या वर सजीव भासणारी गायीची प्रतिकृती
अंभोरा (ता. आष्टी, जि. बीड) -
ग्रामीण संस्कृतीत माणूस आणि जनावर यांचे नाते हे केवळ उपजीविकेपुरते मर्यादित नसते, तर ते स्नेह, आपुलकी आणि कृतज्ञतेच्या भावनेने ओतप्रोत भरलेले असते. या नात्याला प्रत्यक्ष आकार देत, अंबोरा येथील शेतकरी अंकुश ओव्हाळ यांनी आपल्या पहिल्या गायीच्या ऋणातून अविस्मरणीय अशी स्मृती उभारली आहे.
सन १९९९ मध्ये ओव्हाळ यांनी दुग्धव्यवसायाचा धाडसी निर्णय घेतला. एका गायीपासून सुरू झालेला हा प्रवास, त्यांच्या आयुष्यातील "सुवर्णपान" ठरला. गायीच्या उच्च दुधामुळे आलेले आर्थिक स्थैर्य हे फक्त त्यांच्या घरच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या भविष्याचे दार उघडणारे ठरले. या पहिल्या गायीने दिलेल्या आधारामुळे आज त्यांच्याकडे आलिशान बंगला, मुलांचे उच्च शिक्षण आणि १५ पेक्षा अधिक गायींचा समृद्ध गोठा आहे.
५० हजार खर्चून साकारलेली श्रद्धांजली
आपल्या जीवनातील या पहिल्या गायीचे स्मरण सदैव ताजे राहावे यासाठी ओव्हाळ यांनी तब्बल ५० हजार रुपये खर्चून बंगल्या वर सिमेंटची प्रतिकृती उभारली आहे. कसदार कारागिरीमुळे ही प्रतिकृती इतकी वास्तवदर्शी आहे की वाटसरू दूरवरून पाहून तिला खरी गाय समजतात.
“ही गाय माझ्यासाठी फक्त जनावर नाही”
अत्यंत भावुक होत ओव्हाळ म्हणाले :
“ही गाय माझ्यासाठी फक्त जनावर नाही, ती माझ्या कुटुंबाचा जीव आहे. तिने मला पायावर उभे केले, कर्जमुक्त आयुष्य दिले. तिचे ऋण कधीही फेडता येणार नाही; पण तिचा मान आयुष्यभर राखेन. ही प्रतिकृती म्हणजे तिच्याप्रती माझे शाश्वत वंदन आहे.”
गावात चर्चेचा विषय
ही गायीची प्रतिकृती आता अंबोरा गावात आणि परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील लोक प्रत्यक्ष पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. कुणी छायाचित्रे काढत आहेत, कुणी सोशल मीडियावर शेअर करत आहेत. श्रद्धा, कृतज्ञता आणि परिश्रम या त्रिसूत्रीने आकार घेतलेले हे स्मारक गावाच्या इतिहासात एक नवे पर्व लिहून गेले आहे.
एका गायीपासून सुरू झालेला प्रवास
अंकुश ओव्हाळ यांचा हा प्रवास दाखवतो की योग्य वेळेला घेतलेला लहानसा निर्णयही आयुष्याचा मार्ग बदलू शकतो. एका गायीपासून सुरू झालेला हा प्रवास आज यशस्वी दुग्धव्यवसायाचे साम्राज्य बनला आहे. ही केवळ एका शेतकऱ्याची कथा नसून, माणूस आणि प्राणी यांच्या अतूट नात्याचे जिवंत उदाहरण आहे.
stay connected