सेक्सटॉर्शन (Sextortion)" ही घातक व फसवणूक करणारी गंभीर समस्या
"सेक्सटॉर्शन (Sextortion)" ही सध्या इंटरनेट, सोशल मीडिया, आणि डिजिटल संवादामार्फत मोठ्या प्रमाणावर घातक व फसवणूक करणारी गंभीर समस्या बनली आहे. नागरिकांच्या प्रतिष्ठा, मानसिक, आणि आर्थिक स्थितीवर विघातक परिणाम करणारे हे सायबर गुन्हे आहेत.
“सेक्सटॉर्शन” बाबत कोणीही उगडपणे बोलत नाही. त्याचाच फायदा आरोपी घेत असतात. त्यामुळे मनात कोणतंही न्यूनगंड न बाळगता उघडपणे त्यावर चर्चा होऊन सर्वांना त्याचे दुष्परिणाम समजावून सांगणं हे सध्या काळाची गरज आहे. स्वतःच्या चरित्र्याला डाग लागेल म्हणुन अनेकजण या गोष्टी निमूटपणे सहन करतात आणि आर्थिक, मानसिक त्रासाला बळी पडून स्वतःच आयुष्यच उध्वस्त करुन घेतात. यात अनेक विद्यार्थी, समाजातील प्रतिष्ठित नागरीक अडकलेले आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यांना पूर्णतः आळा बसविण्यासाठी त्याबाबतीत जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे.
*सेक्सटॉर्शन म्हणजे काय?*
"Sex + Extortion" या दोन इंग्रजी शब्दांपासून तयार झालेली ही संज्ञा आहे. Sexual content चा वापर करून ब्लॅकमेल करणे म्हणजे सेक्सटॉर्शन.
*"कोणाचे खाजगी अश्लील फोटो/व्हिडीओ/मैसेज वापरून त्यांना पैशासाठी, लैंगिक शोषणासाठी किंवा धमक्यांसाठी ब्लॅकमेल करणे, मानसिक त्रास देणं म्हणजेच सेक्सटॉर्शन."*
*सेक्सटॉर्शन कसे घडते?*
1.सोशल मीडियावर अनोळखी व्यक्ती मित्र बनते.
2.अश्लील संभाषण सुरू होतं किंवा खाजगीमध्ये व्हिडिओ कॉलवर बोलावलं जातं.
3.समोरून आपलं संभाषण / व्हिडिओ रेकॉर्ड केला जातो.
4.तुमचा रेकॉर्ड केलेला व्हिडीओ तुम्हाला पाठवला जातो.नंतर तुम्हाला धमकीचे फोन येतात."हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना/कुटुंबाला पाठवू."
5.ब्लॅकमेल करुन पैसे मागितले जातात. पुन्हा अश्लील कृती करण्यास भाग पाडले जाते.
*अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी खालील माध्यम वापरले जाते?*
WhatsApp, Facebook, Instagram,Telegram,Dating apps (Bumble,Tinder),Video call अँप्स, Fake friend request.
*सेक्सटॉर्शन टाळण्यासाठी अंभोरा पोलीस स्टेशन मार्फत नागरिकांना महत्वाच्या मार्गदर्शक सूचना...*
1.अनोळखी व्यक्तीशी खाजगी संवाद टाळा. व्हिडिओ कॉल, चॅट, मैत्रीच्या रिक्वेस्ट "पूर्ण तपासल्याशिवाय" आजिबात स्वीकारू नका. अनोळखी व्यक्ती जाळ्यात अडकवून तुमचं "खाजगी" बोलणं आणि शरीर दाखवायला भाग पाडतात हिच सेक्सटॉर्शनची सुरुवात असते.
2.खाजगी फोटो/व्हिडीओ शेअर करू नका. स्वतःचे किंवा इतरांचे अश्लील/व्यक्तिगत फोटो/व्हिडीओ कोणा अनोळखी व्यक्तीस कधीही पाठवू नयेत.याचाच रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेलिंगसाठी वापर केला जातो.
3.ब्लॅकमेलिंग झाल्यास घाबरू नका, पोलिसांना माहिती द्या. धमकी देणं, पैसे मागणं, व्हिडीओ व्हायरल करणार असे म्हणणं याला बळी न पडता, लगेच अंभोरा पोलिसांशी संपर्क करा. सायबर सेल, पोलीस ठाणे किंवा 1930 हेल्पलाइन यावर आपली तक्रार नोंदवा.
4.खोट्या सोशल मीडिया अकाउंट्सपासून सावध रहा.फेक प्रोफाईल (फोटो अत्यंत आकर्षक, पण माहिती खोटी) अशा प्रोफाईल्स तुमच्याशी मैत्री करतात व नंतर सेक्सटॉर्शन करतात. शक्यतो ओळखीशिवाय कोणाशीही वैयक्तिक माहिती चुकूनही शेअर करू नका.
5.सायबर सुरक्षेची काळजी घ्या.
तुमचे मोबाईल/लॅपटॉप पासवर्ड नेहमी सुरक्षित ठेवा. वेबकॅम/व्हिडिओ कॉल अॅप्सचा गैरवापर होणार नाही याची खबरदारी घ्या. फिशिंग लिंक, फेक अॅप्स, स्क्रीन शेयरिंग अॅप्स वापरू नका.
6.धमकी दिल्यावर घाबरू नका, तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार करा.
7.तुमचं खाजगी आयुष्य सुरक्षित ठेवणं ही तुमची स्वतःची महत्वपूर्ण जबाबदारी आहे.
8.सायबर गुन्हे नोंदविण्यासाठी 1930 किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर संपर्क करा.
9.अंभोरा पोलीस स्टेशन तुमचे नाव गोपनीय ठेवून गुन्हेगारावर कारवाई करतील. कृपया तक्रार देण्यासाठी पुढे या.
10.पैसे देऊन विषय मिटत नाही. फसवणूक अधिक अधिक वाढत जाते.
कृपया वरील संदेश आपल्या सर्व मित्र/नातेवाईकांना पाठवा. कोणासोबतही अशा प्रकारचा गुन्हा घडून त्याचे मानसिक/आर्थिक नुकसान होऊ नये व त्यातून त्याने डिप्रेशन मध्ये जाऊन स्वतःचे परिणामी कुटुंबाचे आयुष्य उध्वस्त करू नये ही माफक अपेक्षा आहे. 🙏
stay connected