*आष्टीच्या तहसीलदार पाटील मॅडम यांच्या पालकत्वाखाली असेलेल्या जि.प.कन्या प्रशालेच्या शालेय व्यवस्थापन समितीचा आदर्श ठराव*
-----------------
*संगणकीय माध्यमातून बदली करून येणाऱ्या शिक्षकांना आरसा दाखवणारा ठराव सर्वानुमते मंजूर*
--------------------
आष्टी (प्रतिनिधी) - संगणकीय शिक्षक बदली पोर्टल मधून संवर्ग १, संवर्ग २ मधून जे शिक्षक बदलीस पात्र आहेत परंतु त्यामध्ये अकार्यक्षम, वयोवृद्ध आणि गणित, विज्ञान हे विषय इंग्रजी माध्यमातून अध्यापन करण्याचा अनुभव नसणाऱ्या शिक्षकांनी आष्टीच्या जिल्हा परिषद कन्या प्रशाला करिता पसंती क्रमांक एक देऊ नये याबाबतचा ठराव शुक्रवार दि.२० जून रोजी शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला असल्याची माहिती समितीच्या अध्यक्षा सुजाता झगडे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनेक वर्षांनंतर यावर्षी आष्टीतील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या पटसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. याठिकाणी सुसज्ज इमारत, दळणवळणासाठी सोपी आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेली तसेच तब्बल एक हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत असलेल्या या शाळेत शिक्षक म्हणून काम करण्याची इच्छा बदलीस पात्र असणाऱ्या शिक्षकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. अनेकांनी आपली पहिली पसंती कन्या प्रशाला आष्टी साठी दिली असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु प्रशालेतील सतर्क आणि सक्रिय असलेल्या शालेय व्यवस्थापन समितीने एक आदर्श ठराव घेऊन कन्या प्रशालेत शिक्षक म्हणून येण्याची इच्छा व्यक्त केलेल्या शिक्षकांना आरसा दाखविला आहे. सदरील ठरवामध्ये सांगण्यात आले आहे की, जि.प.कन्या प्रशाला ही मुलींना शिक्षण देणारी जिल्ह्यातील सर्वात मोठी शाळा आहे. एका वर्गात जवळपास 50-70 विद्यार्थींनी शिक्षण घेत आहेत. शाळा सेमी इंग्रजी माध्यमिक असल्याने गणित आणि सामान्य विज्ञान हे विषय इंग्रजी मधून शिकवले जातात. येथील शिक्षकांना दैनंदिन वाह्यावर अभ्यास देणे, वह्या तपासणे तसेच इ.पाचवी करीता नवोदय, शिष्यवृत्ती आणि इ.आठवी करिता शिष्यवृत्ती व NMMS या परीक्षेच्या तयारीसाठी शाळेच्या वेळा व्यतिरिक्त जादा तास घ्यावे लागतात.
सध्या प्रशालेत इ.1 ते 5 वी. वर्गाच्या दोन सहशिक्षिका संगणकीय बदलीने इतर ठिकाणी जाणार आहेत. याच वर्गांसाठी एक सहशिक्षकाची जागा रिक्त आहे. तसेच इ.6 ते 8 वी. प्राथमिक पदवीधर इंग्रजी भाषेसाठी एक जागा रिक्त असून गणित आणि विज्ञान विषयाच्या दोन जागा रिक्त आहेत. सदरील रिक्त जागेंवर संगणकीय बदलीच्या माध्यमातून येणारे प्राथमिक पदवीधर शिक्षक हे एकेवेळी 60-70 विद्यार्थिनींना इंग्रजीतुन उत्कृष्ट अध्यापन देण्याचा अनुभव असणारे, शिष्यवृत्ती, NMMS परीक्षेसाठी जादाचे तास घेऊन गुणवत्ता जपणारे तसेच विषयातील सखोल विषयज्ञान असणारे असावेत, प्रशालेत इंटर एकटिव्ह पॅनल, डिजिटल बोर्ड, ओव्हर हेड प्रोजेक्टर आदी उपरकने अध्यापनासाठी असून त्याद्वारे अध्यापन करता येणारे शिक्षक तंत्रस्नेही व अनुभवी असावेत अशी मागणी सर्व पालक व शाळा व्यवस्थापन समितीची असून वरील अपेक्षा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांनीच संगणकीय बदलीच्या माध्यमातून जि.प.कन्या प्रशालेसाठी आपला पसंती क्रमांक द्यावा असे ठरावात नमूद केले आहे.
याचबरोबर अकार्यक्षम, विषयज्ञानाचा अभाव, इंग्रजी, गणित व विज्ञान हे विषय इंग्रजी माध्यमातून अध्यापन करू न शकणाऱ्या आणि जास्तीच्या पटसंख्येत अध्यापन न करता येणाऱ्या, इ.1 ते 4 वर्गांना सेमी इंग्रजी माध्यमातून अध्यापन न करता येणाऱ्या शिक्षकांनी संगणकीय प्रक्रियेतुन बदली करून कन्या प्रशालेत येऊ नये, जर असे अकार्यक्षम शिक्षक बदली करून प्रशालेत आले आणि त्यांच्या अध्यापनाबाबत काही तक्रारी आल्या तर त्यांच्या तक्रारीचा गांभीर्याने विचार करून शालेय व्यवस्थापन समिती वरिष्ठांकडे ठराव देईल असा इशारा ही ठरावात देण्यात आला आहे.
stay connected