वटवृक्ष कोसळला पण तो 'धागा' शाबूत राहिला!
-----------------------
राजेंद्र जैन /कडा
------------------
बुधवारी झालेल्या जोरदार वादळात वडाचे झाड भले ही उन्मळून पडले. मात्र आदल्या वटपौर्णिमेच्या दिवशी खोडाभोवती बांधलेल्या तो ऋणानुबंधाचा धागा तुफान वादळात देखील शाबूत राहिला.
हवामान खात्याचा कडक इशारा वादळ वडाभोवतीच फिरणार आहे. वटपौर्णिमेच्या निमित्ताने व्हायरल झालेला हा मेसेज एका वेगळ्या अर्थाने खरा ठरला आणि बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने आष्टी, कडा रस्त्यावरचे एक वडाचे झाड धराशायी झाले. वटपौर्णिमा हा पती- पत्नीच्या नात्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा सण आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा. या प्रार्थनेसाठी महिला वडाभोवती प्रदक्षिण घालतात. सौभाग्यवती पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात . मंगळवारी वटपौर्णिमा असल्याने आष्टी, कडा रस्त्यावरील एका वडाच्या झाडाभोवती परिसरातील महिलांनी फेरी मारून प्रार्थना देखील केली. मात्र बुधवारी सायंकाळी सहा वाजेनंतर झालेल्या जोरदार वादळाने आष्टीकरांच्या दैनदिन प्रवासाची साक्षीदार असलेले हे वडाचे झाड खोडापासून उनमळून पडले. मात्र वडाच्या खोडाभोवती सौभाग्यवतींनी बांधलेल्या दोऱ्याचा धागा मात्र एवढ्या वादळातही भक्कम राहिल्याचे चित्र पाहायला मिळाले.
stay connected