स्वराज्याचा छावा Chhatrapati Sambhaji Maharaj

 " स्वराज्याचा छावा "

**********************



आपला इतिहास हा आपल्याला प्रेरणा देत असतो,तो आपल्या भविष्याला दिशा देणारा असतो, तो आपल्या वर्तमानाशी पूरक असतो,आपण सर्वच जण सुदैवी आहोत की आपल्या देशाला,राज्याला छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांचा आपल्यासाठी प्रेरणादायी असलेला गौरवशाली इतिहास लाभला आहे.आपल्या देशासाठी लढणारी,झुंजणारी प्रसंगी स्वतःच्या प्राणांची बलिदान देणारी माणसं या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली तयार झाली,या पुण्यवान मातीमध्ये असाच एक महामेरू रुद्र जन्माला आला,शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा घेतलेला,त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य कसोशीने संवर्धन करणारा, पिढ्यान पिढ्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत ठरलेला असा तो म्हणजे छत्रपती संभाजी!

14 मे 1657 साली किल्ले पुरंदर येथे शिवाजी महाराज व सईबाई राणीसाहेब यांच्या पोटी संभाजी महाराज यांनी जन्म घेतला,असे म्हणतात की प्रत्येक माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा त्याचा सगळा प्रवास  ठरलेला असतो,त्या प्रवासाला सुख व दुःख या दोन्ही ची किनार असते परंतु शिवपुत्र संभाजी या युवराजला जन्मापासून मृत्यूपर्यंत फक्त संघर्ष आणि संघर्षच वाट्याला आला.अवघे दोन वर्ष वय असतानाच आई सईबाई यांचे अकाली निधन झाले,त्याचवेळी स्वराज्य उभारणीच्या धावपळीच्या कामात वडील शिवाजी महाराजांना पुत्रासाठी फारसा वेळ देता आला नाही.या परिस्थितीत आजी आऊसाहेब जिजाऊ या चालत्या बोलत्या विद्यापीठामध्ये बाल संभाजी चे शिक्षण सुरू झाले. धनुर्विद्या, तलवारबाजी,मल्लखांब, घोडेसवारी,भालाफेक याचा सराव सुरू झाला,रोजच्या व्यायामामुळे शरीर बळकट व पिळदार होऊ लागले.विज्ञान, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, राजकारण व विविध भाषा यांचे शिक्षण सुरू झाले.त्यांनी एकूण 16 भाषेवर प्रभुत्व मिळवले होते,संस्कृतचे ते तर महापंडित होते.जगाच्या पाठीवर संभाजी हा एकच राजा असा होऊन गेला की त्याला एकाच वेळी  शस्र व शास्र या दोनी गोष्टीत तो पारंगत झालेला होता.वयाच्या 9 व्या वर्षापासूनच संभाजी महाराजांनी स्वतःला स्वराज्याच्या कामासाठी झोकून दिले होते,या वयाच्या 9 व्या वर्षीच 1250 किमी चा घोड्यावर दिवस रात्र खडतर प्रवास करून शिवाजी महाराजांबरोबर आग्रा येथे औरंगजेब भेटीस गेले होते,खरेतर त्याचवेळी संभाजी महाराजांचा राजकारणात प्रवेश झाला असे म्हणले तरी ते वावगे होणार नाही.मोगल दरबारातील राजकारण,तिथे शिवाजी महाराजांनी दाखवलेला बाणेदारपणा,त्यांचा राजकीय मुत्सद्दीपणा व त्याला मिळालेली बाल संभाजी महाराजांची साथ, आग्ऱ्यात संभाजी महाराजांना मिळालेला अनुभव व संस्कार हाच त्यांच्या भावी राजकारण प्रवेशासाठीची नांदी ठरला.

सहयाद्रीच्या कुशीत व महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेल्या या शूर मराठ्याच्या पोराने वयाच्या अवघ्या 10 वर्षीच लढाया करायला सुरुवात केली, त्यावेळी त्याने रामनगर,

भागानागर,खमबायत या लढाया यशस्वी केल्या,या संपूर्ण जगात संभाजी हा एकच असा अजिंक्य योद्धा होऊन गेला की ज्याने अगदी कमी कालावधीत कुठलीही माघार वा युद्ध तह न करता सलग 140 हुन अधिक लढाया जिंकल्या,ज्याची नोंद गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविली गेलेली आहे.युद्धासाठी आवश्यक असलेले पाहिले बुलेट प्रूफ जॅकेट ही संभाजी महाराजांनी स्वतःच्या कल्पकतेने तयार केले होते,कोकणातील 

रानदर्यात झालेल्या लढाईत पहिल्या जैविक अस्त्र चा प्रयोग ही संभाजी महाराजनीच केला होता,मोगलांच्या 40 हजार सैनिकांना नारळाचे विषारी कोलीत खाऊ घालून त्यांना मारले होते आणि  त्याच वेळी तितकेच अजून 40 हजार तलवारीने कापले होते व मोठा विजय त्या लढाईत मिळवला होता.

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले स्वराज्य संभाजी महाराजांनी 5000 किमी अंतराने अजून वाढवलं, स्वराज्याच्या संपत्तीत पाच पटीने वाढ केली,एकूण 9 राज्यांचा समावेश त्यांनी स्वराज्यात केला, नवीन गडकोटांची बांधणी केली,स्वराज्याच्या सगळ्या सीमा बळकट केल्या.शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला अत्यंत प्रिय व महत्वाची असणारे बुरानगर व औरंगाबाद या शहरावर संभाजी महाराजांनी हल्ला केला व अमाप संपत्ती या दोन्ही शहरांमधून स्वराज्य कामासाठी मिळवली,संभाजी महाराजांच्या धाडसीपणा व व्यक्तिमत्वावर प्रभावित होउन औरंगजेबाचा मुलगा अकबर हा संभाजी महाराजांना येऊन मिळाला होता.त्यामुळेच काबुल पासून बंगाल पर्यंत साम्राज्य विस्तार असलेले आपले राज्य सोडून  स्वतः औरंगजेब चिडून दक्षिणेवर हल्ला करून संभाजी चा पराभव करण्यासाठी आला होता त्यावेळी त्याने 8 लाखाचे सैन्य त्याच्याबरोबर होते,मोठा सगळा लवाजमा,अनेक वीर सरदार त्याच्या बरोबर आले होते पण संभाजी महाराजांच्या युद्ध कौशल्य मुळे त्याचा निभाव इकडे दक्षिणेत लागला नाही,मणभर साम्राज्य असलेला औरंगजेब संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर ही 14 वर्ष स्वराज्याची कणभर मातीही जिंकू शकला नाही,शेवटी स्वतः 27 वर्ष वयाची झुंज देऊन ही स्वराज्य दक्षिण जिंकण्याचे स्वप्न अधुरे ठेवून औरंगजेबाने अहमदनगर जवळ आपला प्राण सोडला.

कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीत रडण्यापेक्षा त्याच्या बरोबर लढून ती परिस्थिती अनुकुल करण्याचे

सूत्र शंभू चरित्रातून शिकायला मिळते,त्यांच्या मते कुठलाही पराभव आधी मनात होतो व मग तो रणात होतो,जी माणसं मनात जिंकलेली आहेत ती रणात कधीच पराभूत होऊ शकत नाहीत.म्हणूनच एकाच वेळी संभाजी महाराज बारा आघाड्या 

वर लढत होते,इंग्रज,पोर्तुगीज, डच,मोगल,सिद्धी,स्वराज्यातील काही मंत्रीगण व त्यांच्यामुळे निर्माण झालेला गृहकलह या सगळ्या बरोबर त्यांना एकाच वेळी लढावे लागत होते. शिवाजी महाराज जिवंत असेपर्यंत मोगलांचे सरदार स्वराज्यावर आक्रमण करीत होते पण संभाजी महाराजांवर स्वतः औरंगजेब दिल्ली सोडून आक्रमण करण्यासाठी आला होता.

संभाजी महाराज हे निर्व्यसनी, रूपवान,धैर्यवान,कर्तृत्ववान, मुत्सद्दी, शूर,कार्यकुशल वा सतत कामात गडलेले विनम्र व संयमी राजे होते,त्यांनी स्वतः शेतकऱ्यांसाठी शेती व दुष्काळ योजनेचा एक आराखडा तयार केलेला होता,अनेक नवीन धरणं, कालवे त्यांनी बांधली.

राजकारणाच्या प्रत्येक आघाडीवर संभाजी महाराजांनी स्वतःला सिद्ध केले होते,अगदी आग्रा भेट,मिर्झा जयसिंग यांच्याकडे ओलीस राहणे असो वा शिवाजी महाराजांच्या रणनिती नुसार दक्षिण मोहिमेत मोगल व आदिलशहा यांची युती न व्हावी म्हणून स्वराज्य रक्षणासाठी दिलेर खान ला जाऊन मिळणं असो प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांचे धाडस व कर्तृत्व दाखवून दिले,औरंगजेब इकडे दक्षिणेत आला तर संभाजी महाराजांनी त्याच्या प्रदेशावरच जाऊन हल्ला केला.प्रत्येक ठिकाणी संघर्ष वाट्याला येऊन सुद्धा राष्ट्रभक्ती,राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रधर्मासाठी आपले अल्प असलेले आयुष्य घालणारा संभाजी हा राजा होता.

तत्कालीन बखरकार मल्हारी रामराव चिटणीस याच्या स्वराज्य द्रोही आजोबाला झालेली शिक्षा पाहून त्याने चिडून विकृत मनोवृत्ती ने संभाजी महाराजांचा खोटा इतिहास आपल्या बखरीत लिहिला,त्यांना बदनाम करण्याचे षड्यंत्र रचले,स्वराजच्या मंत्रांच्या भ्रष्ट कारभारावर संभाजी महाराजांनी अंकुश घातल्यामुळे काही अनाजी पंतांसारख्या मंत्र्यांनीही संभाजी महाराजांची बदनामी होईल अशी त्याकाळी कारस्थाने रचली,त्या चुकीच्या बखरीचा अर्थ लावून त्यांच्याच वंशजांनी आज जवळपास 70 नाटक व 14 चित्रपटातून अस्तित्वात नसलेली बदनामीकारक स्त्री पात्र संभाजी महाराजांबरोबर जोडली व त्याची प्रसिद्धी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी समाजासमोर दाखवली,इंग्रजी शब्दाच्या अर्थाचा अनर्थ करून त्यात दाखवला गेला पण नंतर अनेक इतिहासकारांनी त्यात सखोल संशोधन करून खरे संभाजी चरित्र समाजासमोर आणले.

संभाजी महाराज जर खरच अय्याशी असते तर त्याकाळी असलेल्या  पुरुषांना एका पेक्षा जास्त विवाह करता येतात या परंपरेनुसार स्वतःचे बरेच विवाह करता आले असते परंतु एक पत्नी व्रत त्याकाळी सांभाळणारे,आपल्या पत्नीवर प्रचंड प्रेम असणाऱ्या या राजाने त्यांच्या वडिलांच्या परवानगीने आपली पत्नी येसूबाई ला महिला सन्मान देऊन या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून नियुक्त केले होते.



स्वतः एक उत्तम साहित्यिक असलेल्या संभाजी महाराजांनी आपल्या बुधभूषण या संस्कृत ग्रंथात राजकारणाची चर्चा व मानवाने चांगले वागण्यासाठीचे सात लक्षणे विस्ताराने सांगितली त्यातील एकपत्नी व्रत हे प्रमुख लक्षण होते,नखशिखांत या आपल्या दुसऱ्या ग्रंथात नखापासून ते केसापर्यंतचे आरोग्य शास्त्र सांगितले, भेदनायिका या आपल्या तिसऱ्या ग्रंथात महिलांचे असलेले वेगवेगळे स्वभाव सांगितले व त्यावर त्यांना मार्गदर्शन केले, सातसतक हा अध्यात्मवर आधारित चौथा ग्रंथ त्यांनी लिहिला,दंडणीती व मित्यक्षर ही ग्रंथ निर्मिती त्यांनी करून ठेवली.कवी कलश सारखा कवी सल्लागार मित्र आयुष्याच्या शेवट पर्यंत त्यांच्या बरोबर होता. गोवा येथिल प्राचीन चर्च मधील दैवी सेंट झवेरीयर याचे मृत शरीर असलेली पेटी एका विशिष्ट दिवशी बाहेर काढण्याची प्रथा सुद्धा संभाजी महाराजांनीच सुरू केलेली आहे.



प्राचीन वीर योद्धे असलेल्याचा इतिहास असे सांगतो की ज्यांना युद्धभूमीवर समोरासमोर पराभूत करता येत नाही त्यांच्याशी फितुरी करून पाठीमागून वार करून पराभूत केले जाते,शेवटी संभाजी महाराजांसाठी औरंगजेबाने हाच मार्ग निवडला,महाराजांच्या सख्या सोयऱ्याला फितूर करून धोक्याने त्यांना बाहेर बोलावून निशस्त्र संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कैद केले,त्यांचे चाळीस दिवस प्रचंड हालहाल करून हत्या केली.सरतेशेवटी औरंगजेब म्हणाला माझ्या चार मुलांपैकी एक जरी संभाजी सारखा पराक्रमी मुलगा मला लाभला असता तर मी सगळ्या जगावर हुकूमत केली असती.

संभाजी महाराजांची अमानवीय हत्या झाल्यानंतर स्वराज्यातील प्रत्येक मावळा चिडून राजाशिवाय सलग 14 वर्ष औरंगाजेबाशी प्राणपणाने लढला व एक किल्ला सोडता औरंगजेबाच्या हाती काहीच लागू दिले नाही.त्यामागे  होती शिवपुत्र संभाजी ची प्रेरणा, त्यांनी शिकवलेला स्वाभिमान व त्यांच्या प्राणाचे बलिदान.



हाच शिवाजी ,संभाजी महाराजांनी दिलेला वारसा,तीच मातृभूमीसाठी शाहिद होण्याची परंपरा आज ही महाराष्ट्र मोठ्या हिमतीने चालवतो आहे कारण कस जगावं हे शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकवलं व फक्त 31 वर्ष अल्पायुषी जीवन मिळालेल्या संभाजी महाराजांनी मातृभूमीसाठी कसं मरावं हे दाखवलं.

'देश स्वराज्य पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एक ही शंभू राजा था'

या 'स्वराज्याचा छावा' असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व मानाचा मुजरा....!!


लेखक-
प्रा.महेश कुंडलिक चौरे,
आष्टी.
मो.9423471324



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.