उन्हाच्या तडाक्यात धानोरकरांना विद्युत वितरण कंपनीचा शॉक !
संतप्त ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात !
धानोरा (प्रतिनिधी ) - दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे . तापमानाचा पारा चढला आहे . अशातच जनतेला फॅन व कुलरचा आधार घ्यावा लागतो . मात्र वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊन विज गुल झाल्याने जिवाची लाही लाही होते . तेव्हा मात्र महावितरण च्या गलथान कारभाराचा पंचनामा होतो व उकाड्याने हैराण झालेल्या संतप्त नागरिकांचाही पारा चढतो . आष्टी तालुक्यातील धानोरा येथे काल शुक्रवार दि . 2 मे च्या रात्री 11.30 ला लाईट गुल झाल्याने अनेकांनी उकाड्यामुळे रात्र जागुन काढली तर शनिवार दि 3 मे रोजीही दिवसभर लाईट न आल्याने ग्रामस्थ चांगलेच संतापल्याचे पहावयास मिळाले .
विद्युत वितरण कंपनी च्या गलथान कारभारामुळे जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे . विजे अभावी पिण्याच्या पाण्याचीही उपलब्धता होऊ शकत नसल्याने जनतेचे हाल होत आहेत . शेतकऱ्यांच्या जनावरांना पाणीही मिळेनासे झाले आहे . तात्काळ विद्युत पुरवठा सुरळीत चालू करावा . अन्यथा हंडा मोर्चा काढून महावितरण चा निषेध केला जाईल असा इशारा सरपंच सुभाष शेळके , सय्यद मुसाभाई , शिवाजी चव्हाण , डॉ . राज शेख यांनी दिला आहे .
stay connected