गणिताचे सर - एक अविश्वसनीय सत्यकथा (आदरणीय श्री. व्ही. एस. वाणी सरांच्या जीवनावरील)

 गणिताचे सर - एक अविश्वसनीय सत्यकथा
(आदरणीय श्री. व्ही. एस. वाणी सरांच्या जीवनावरील)



आई, आज मला शाळेतून घरी यायला उशीर होईल कारण, आज आमच्या गणिताच्या सरांचा निरोप समारंभ आहे. अनेक मुला-मुलींनी त्यांच्या आईला हेच सांगितले.


संस्थेच्या अध्यक्षांनी सरांचा सत्कार करताना सांगितले की आज आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि आपणा सर्वांच्या आवडत्या गणिताच्या सरांचा निवृत्तीचा दिवस. गेली अनेक वर्षे सरांनी आपल्या संस्थेतील विविध शाळांमध्ये गणित हा विषय शिकविला. गणित हा विषय तसा शिकायला आणि शिकवायला अवघड पण सरांनी हा विषय अतिशय रंजक आणि सोप्या पद्धतीने शिकविला. त्यामुळेच आपल्या शाळेतील शंभराहून अधिक विद्यार्थ्यांनी गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळविलेत. 


सत्काराला उत्तर देताना सरांनी जे सांगितले ते अविश्वसनीय होते. सरांनी ग्रॅज्युएशनलाच नव्हे तर मॅट्रिकला सुद्धा गणित विषय घेतला नव्हता. सर सायन्स ग्रॅज्युएट नव्हते तर आर्ट्स ग्रॅज्युएट होते. 


ही माहिती देऊन केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर बहुतांश शिक्षकांनाही आश्चर्याचा धक्का देत, सर क्षणात त्यांच्या भूतकाळात शिरले.


सरांची जन्मतारीख तशी विलक्षणच. जन्मतारखेतील दिवस, महीना आणि वर्ष, तिघेही बाराच्या पटीतील. जन्म तारखेतील दिवस आणि महिना यांची बेरीज म्हणजे जन्मतारखेतील वर्ष असलेली अनोखी तारीख २४-१२-३६. ज्योतिष शास्त्रानुसार या तारखेचा जन्म म्हणजे प्रचंड भाग्य, परंतु दुर्दैवाने तसे भाग्य सरांच्या नशिबी लिहिले नव्हते. 


सातवीपर्यंतचे शिक्षण कजगांव येथे झाले. पुढील शिक्षणाची व्यवस्था या लहानशा गावात नसल्यामुळे १३ किलोमीटर अंतरावरील चाळीसगांव येथे आठवीत प्रवेश घेतला. दिवसात फक्त दोनच वेळा असलेल्या पॅसेंजर ट्रेनने जाणे येणे सुरू झाले. जेमतेम अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी किमान तास दीड तास स्टेशन वर थांबावे लागे. या वेळाचा उपयोग करायचा गृहपाठ करायला. ट्रेन आली नाही तर पाढे म्हणत किंवा पाठांतर करत पायपीट करत जायचे. 


नववीच्या शिक्षणासाठी सरांची रवानगी दोंडाईचा येथे झाली आणि त्यानंतर दहावीला परत चाळीसगांवला. ट्रेनच्या वेळा बदलल्यामुळे शाळेत यायला रोज उशीर होऊ लागला. परीक्षेच्या काळात रेल्वे स्टेशन हेच सरांचे घर बनले. एका शिक्षकांच्या हे लक्षात आले आणि त्यांनी परीक्षेच्या काळात सरांची राहण्याची व्यवस्था त्यांच्या खोलीत केली. 


सरांची दहावी झाली आणि घरच्यांनी ठरविले की सरांनी शिक्षण सोडून शेती करावी. सरांनी तीन वर्षे शेती केली परंतु त्यात त्यांचे मन रमले नाही. सरांनी आई आणि वडिलांना केदारनाथ आणि बद्रीनाथ ही त्याकाळची अतिशय अवघड यात्रा करवून थोडीशी पुण्यप्राप्ती केली.


शिकण्याची प्रबळ ईच्छा, आत्मविश्वास आणि त्याला दुजोरा मिळाला आईच्या हुशारीचा आणि वडिलांच्या दूरदृष्टीचा. तीन वर्षांच्या खंडानंतर सरांनी पुनश्च शिक्षणाचा श्रीगणेशा केला. वडील बंधूंनी सरांना संगमनेरला आणून योग्य मार्गदर्शन केले. सरांनी त्यावेळची मॅट्रिकची परीक्षा दिली गणित हा विषय सोडून. 


काकू, तुमचा विठ्ठल मॅट्रिकची परीक्षा पास झाला, पेढे द्या, सरांचा मित्र म्हणाला. कोण विठ्ठल? सरांच्या आईने विचारले. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण परमेश्वराला विसरू नये, निदान मुलाला हाक मारताना तरी देवाचे नांव आपल्या मुखातून निघावे म्हणून मी मधुचे शाळेतील नांव विठ्ठल ठेवले, पांडुरंगावर अपार श्रद्धा असणाऱ्या सरांच्या वडिलांनी स्पष्टीकरण दिले.


पुढील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला परंतु नियतीला ते मान्य नव्हते. गावात डोळ्यांची साथ आली. गोमुत्रात तुरटी मिसळून ते गोमूत्र डोळ्यात घाला, एका आजीबाईंनी सांगितले. मात्र हा उपाय जालीम आणि राक्षसी ठरला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर सरांना धुसर आणि अस्पष्ट दिसू लागले. त्यांचा एक डोळा पूर्णतः आणि दुसरा अर्धा निकामी झाला होता. 


सर्वानुमते ठरलं आणि त्याप्रमाणे सरांची रवानगी पुण्यातील औंध आय टी आय मध्ये टेलरिंग चा कोर्स करण्यासाठी झाली. कोर्स पूर्ण होताच सरांना खोपोली येथील आय टी आय मध्ये टेलरिंग इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरी मिळाली. 


फक्त झोपता येईल एवढ्याच आकाराची रूम, सर्व दैनंदिन विधी सार्वजनिक जागेत आटोपून, दोन मैल पायपीट करून शाळेत जायचे, रस्त्यातच स्वस्त तोच मस्त मानून स्वस्तात स्वस्त चहा प्यायचा, खिशाला परवडत नव्हते म्हणून मर्यादित थाळीत भूक भागवायची आणि झोपायला म्हणून रूममध्ये यायचे.


टेलरिंग क्षेत्रात आयुष्य काढायला सरांचे मन तयार होत नव्हते परंतु दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता आणि अचानक अंधारातून प्रकाशाचा किरण यावा त्याप्रमाणे भिवंडी येथील एका शाळेची क्राफ्ट टीचर साठी जाहिरात आली. सरांनी अर्ज केला. यावेळी नशिबाने पूर्ण साथ दिली आणि लवकरच सर भिवंडी येथील शाळेत क्राफ्ट टीचर म्हणून रुजू झालेत. 


राहायची व्यवस्था करता येत नव्हती कारण त्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. ही अडचण सनजल्यावर शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतीलच एका रूममध्ये राहायला परवानगी दिली. शाळा सुरू होण्याआधी उठायचे, नळावर उघड्यावरच आंघोळ करून मुलं शाळेत येण्याआधी तयार व्हायचे. दिवसभर विद्यार्थ्यांना मन लावून शिकवायचे आणि शाळा सुटल्यावर त्याच विद्यार्थ्यांमध्ये, त्यांच्यातीलच एक बनून खेळायचे देखील. साहजिकच लवकरच सर "विद्यार्थी प्रिय" शिक्षक बनलेत.


सरांची हुशारी, जिज्ञासा आणि चिकाटी मुख्याध्यापक साहेबांनी हेरली आणि त्यांनी सरांना एक्स्टर्नल हा पुढील शिक्षणाचा मार्ग सुचवून त्यासाठी सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. शाळेत एका अर्धवेळ शिक्षकाची गरज निर्माण झाली आणि सरांच्या हालाखीच्या परिस्थितीकडे बघून मुख्याध्यापकांनी सरांच्या विनवणीला मान देत ती जागा सरांना दिली. थोडक्यात सरांना दीडपट पगार मिळू लागला, सकाळी ७ ते दुपारी ३ पर्यंत काम करून. एक लहानशी खोली भाड्याने घेऊन तीच्यात सरांचा संसार आणि अभ्यास सुरू झाला. 


नशिबाने परत एकदा दगा दिला. दिवसभर एकाच डोळ्यावर ताण पडल्याने रात्रीच्या वेळी सरांना त्या डोळ्याने अस्पष्ट दिसू लागले. त्यामुळे रात्रीचा अभ्यास बंद झाला आणि शाळा सुटल्यानंतर प्रथम अभ्यास, नंतर स्वयंपाक आणि त्यानंतर जेवण अशी सरांची दिनचर्या सुरू झाली.


परीक्षा जवळ आली परंतु पुरेसा अभ्यास झाला नव्हता त्यामुळे सरांची धडधड वाढली. नशिबाचे फासे अचानक पलटले. सरांचा लहान बंधू आणि भाचा सरांचे डोळे बनलेत. परीक्षेच्या आदल्या रात्री हे दोघं आळीपाळीने सरांना पुस्तक वाचून दाखवत आणि त्यावर सरांनी पेपर लिहिलेत. असे करत करत सरांनी बी ए ही पदवी प्राप्त केली. 


मुळातच गणिताची आवड, कुटुंबाकडून आलेला गणिताचा वारसा आणि वडील बंधूंप्रमाणे आपणही गणिताचे उत्तम शिक्षक व्हावे अशी तीव्र इच्छा असल्याने सरांनी गणिताचा अभ्यास सुरू केला. खूप मेहनत घेत एस एस सी बोर्डाच्या गणिताच्या पेपरमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळतील एवढी भक्कम तयारी केली. सरांचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्याच संस्थेच्या डोंबिवलीच्या शाळेतील मुख्याध्यापकांशी बोलताना सरांनी सहज विचारले, सर काही शक्यता आहे का मला तुमच्याकडे ट्रान्सफर मिळण्याची? 


सर, आमच्याकडे जागा आहे परंतु ती क्राफ्ट टीचरची नाही तर गणिताच्या सरांची, तुम्ही पेलू शकाल का ही जबाबदारी? सरांनी मोठ्या हिमतीने आणि आत्मविश्वासाने ट्रॅक बदलला आणि लवकरच विद्यार्थीप्रिय गणिताचे सर बनून त्यांनी मुख्याध्यापकांची शाबासकी मिळविली. 


एका गरीब पण बुद्धिमान आणि मेहनती मुलीशी सरांचे लग्न झाले. दोन पुत्ररत्न प्राप्त झालेत. जबाबदारी वाढली.

अहो कसली चिंता करतात तुम्ही? खूप काळजीत दिसतात, काय कारण आहे? बाईंनी विचारले. 

आपला संसार माझ्या अर्ध्या डोळ्यावर चाललाय. मला काळजी वाटते जर माझा हा अर्धा डोळाही निकामी झाला तर आपले कसे होणार?

सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका माझ्या दोन डोळ्यांपैकी एक डोळा मी तुम्हाला देईन, बाईंनी सांगितले. 

मला तुझ्याकडून याहीपेक्षा जास्त हवे आहे.

सर बोला, काय हवे तुम्हाला? तुम्ही मागाल ते देईन मी, बाई आत्मविश्वासाने म्हणाल्यात.


तुझे शिक्षण मॅट्रिक पर्यंत झाले आहे, मला वाटते तू ग्रॅज्युएशन करून नोकरी करावी. जर दुर्दैवाने माझा दुसरा डोळाही निकामी झाला आणि माझी नोकरी गेली तर निदान तुझ्या नोकरीवर तरी आपला संसार चालेल. 


बाईंनी आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. घर सांभाळून, एम ए आणि बी एड ह्या पदव्या प्राप्त करून त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत सरांनाही मागे टाकलं. 


अतिशय सुंदर अक्षर,  दोन्ही हातांनी लीलया लिहिण्याची कला, विषयाशी समरस होऊन तो अतिशय सोप्या पद्धतीने शिकविण्याची हातोटी यामुळे बाईंना शिक्षिकेची नोकरी सहज मिळाली. संसाराला हातभार लागला, सरांचे हेलकावणारे मन स्थिर झाले. 


ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत असताना सरांनी आणि बाईंनी अनेक विद्यार्थी घडविलेत. त्यांचा विद्यार्थी वर्ग केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पसरलेला आहे. 


शिकायची तीव्र इच्छा असलेल्या एका भिकाऱ्याच्या मुलाला सरांनी त्यांच्या शाळेत प्रवेश दिला, स्वतःच्या खोलीत राहायला जागा दिली. योग्य मार्गदर्शन करून त्याचे मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण झाल्यावर स्वतःच्या ओळखीने नोकरी मिळवून दिलेला तो होतकरू मुलगा एम एस इ बी त खूप मोठ्या पदावर काम करून निवृत्त झाला. 


सरांच्या एका विद्यार्थ्याने तर दहावीचा शालेय अभ्यासक्रम आणि दहावीचे गणिताचे पुस्तक बनवण्यात मोलाची कामगिरी केली आहे. 


प्रचंड कष्टांच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या सरांना संस्थेतील राजकारणामुळे बऱ्याचदा त्रासही झाला. सरांनी न डगमगता त्यांची व्यथा शिक्षणाधिकारी साहेब तसेच संस्थेच्या अध्यक्षांपर्यंत पोहोचवून होणाऱ्या त्रासाचा वेळोवेळी नायनाट केला. स्वतःवरील अन्यायाला वाचा फोडताना इतरांवरही अन्याय होणार नाही याची त्यांनी सदैव दक्षता घेतली.


एके दिवशी अगदी सकाळी सरांचा फोन खणखणला. सर, तुमची मुलगी सध्या काय करते? काल संध्याकाळी मला ती सी एस टी फास्ट लोकलमध्ये दिसली. सरांची एक विद्यार्थिनी विचारत होती. खरं तर सरांना मुलगी नाही. ही मुलगी म्हणजे सरांची भाची, जीला सरांनी बालवाडी पासून, ग्रॅज्युएशन पर्यंत अगदी पोटच्या मुलीसारखे सांभाळले. मित्रमंडळींनाच काय तर बऱ्याचशा नातेवाईकांनाही खूप उशिरा समजले की ती सरांची मुलगी नव्हती.


निवृत्तीपर्यंतचा प्रवास सरांनी अर्ध्या डोळ्याने पार पाडला. त्यानंतर मात्र परमेश्वराला त्यांची दया आली आणि एका नेत्र पेढीतून एक छानसा डोळा सरांना मिळाला. नवी दृष्टी, नवीन विश्व. सरांनी आणि बाईंनी संपूर्ण जग बघण्याचा आनंद घेतला.


आपल्याला पडलेले कष्ट इतरांना करावे लागू नयेत म्हणून त्यांनी अनेकांना मदत आणि मार्गदर्शन केले. समाजसेवा करता करता त्यांनी त्यांच्या माता-पित्यांची देखील सेवा केली. 


दादर आणि डोंबिवली येथील नामांकित शिक्षण संस्थांचे संचालक पद भूषविताना सरांनी कित्येक गरजू आणि गरीब मुला-मुलींना नोकरी मिळवून देण्याचे सत्कार्य केले.


तुटपुंजा पगार, वाढता खर्च, व्यस्त जीवन, स्वतःपेक्षा इतरांसाठी काहीतरी करण्याची प्रवृत्ती यामुळे सरांनी स्वतःचा वाढदिवस कधीच साजरा केला नाही. म्हणून सरांच्या दोन्ही मुलांनी सरांचा ७५ वा वाढदिवस सरांना यत्किंचितही पूर्वसूचना न देता मोठ्या दिमाखात साजरा केला. कसलीही कल्पना नसताना जवळची मित्रमंडळी, गावातील प्रतिष्ठित मंडळी आणि दूरवरून आलेल्या आप्तेष्टांना एकत्र बघून सरांना आश्चर्याचा सुखद धक्काच बसला. सरांवरील नितांत प्रेमामुळेच या सोहळ्याची उपस्थिती उल्लेखनीय होती.


एकदा शनिवारी संध्याकाळी सर ठाण्याला बस स्टॉपवर उभे होते, तेवढ्यात एक आलिशान गाडी सरांपाशी येऊन थांबली. आमदार साहेब! सर म्हणालेत. सर, आमदार नाही, मी तुमचा विद्यार्थी असे म्हणत आमदार साहेबांनी सरांना मोठ्या आदराने गाडीत बसवून त्यांच्या ऑफिसमध्ये नेले. अनेक मंडळी भेटीसाठी थांबली होती. आमदार साहेबांनी डिक्लेअर केलं आज मी कुणालाही भेटणार नाही. आजची संध्याकाळ मी माझ्या सरांबरोबर घालवणार. मी जो काही आहे, ते केवळ या सरांमुळेच, यांनीच मला घडविले. मनसोक्त गप्पागोष्टी, त्यानंतर जेवण झाल्यावर आमदार साहेबांनी सरांना घरी सोडले. एवढ्या मोठ्या व्यक्तीने, खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतानाही सर्व मीटिंग्ज कॅन्सल करून माझ्याबरोबर वेळ घालवला हे कसं? या प्रश्नाचे उत्तर मात्र आयुष्यातील अनेक प्रश्न लीलया सोडवणाऱ्या आमच्या गणिताच्या सरांना सापडले नाही. 


वय वर्ष ८८, तंदुरुस्त प्रकृती परंतु जडलेले एक व्यसन ते म्हणजे शिकवण्याचं. आता सर विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनाही मार्गदर्शन करतात, कसलाही मोबदला न घेता. 


आजही सर भेटल्यानंतर कितीतरी आजी-आजोबा आपल्या नातवंडांना, कितीतरी आई-वडील आपल्या मुलांना सांगतात हे आमचे गणिताचे सर ज्यांच्यामुळे आम्ही घडलो. 


शेतकरी ते शाळेतील सर व्हाया क्राफ्ट टीचर, त्यानंतर गणिताचे सर, शाळेचे मुख्याध्यापक, संस्थेचे संचालक असा प्रगतीचा चढता आलेख पण तरीही सदैव साधेपणा आणि नम्रता. आपल्या प्रगतीचे आणि यशाचे संपूर्ण श्रेय सर आपल्या आई-वडिलांना आणि मोठ्या बंधूंना देऊन एक 

महत्त्वाचा संदेश आपल्याला  देतात - 

विद्या विनयेन शोभते।


-दिलीप कजगांवकर, पुणे
७७७००२५५९६




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.