अबोली
------
गेल्या महिन्यात जयपूर - दिल्ली फ्लाईटमध्ये मला एक छान सोबत लाभली. आधुनिक राहणी, आवाजात माधुर्य, प्रसन्न नि आकर्षक व्यक्तिमत्त्व.
मीच बोलत होतो, तीच्याकडून फक्त हो का, अरे वा, छानच, सुरेख. मी फोन नंबर मागितला त्याला स्पष्ट पण गोड नकार, तरीही मी कागदावर लिहून दिलेला माझा नंबर तीने पर्समधे हळूच ठेवला. तेही नसे थोडके!
लगेज बेल्टवर आलेली तीची बॅग मी उचलून तीला सुपुर्द केली.
ती - थॅंक्स, मी अबोली.
मी - अगदी नावाप्रमाणे.
अबोली लाजली.
मी प्रशांत.
ती - नांवाप्रमाणे बिलकुल नाही.
दोघेही खळखळून हसलो
ती - टेक केअर, सी यू, बाय.
मी - पुण्यात आलात तर फोन करा.
निरोप घेताना डोळे पाणावलेत, मा.....झे. त्यामुळेच तीच्या डोळ्यातील पाणी दिसले नसावे मला.
परवा फोनवर तोच मधुर आवाज. मी पुढच्या आठवड्यात पुण्याला येतेय. 3 दिवस मुक्काम आहे. तुम्हाला वेळ असल्यास भेटू.
तुझ्यासाठी वेळच वेळ, मी रजा घेईन अबोली. मी पुटपुटलो, मनातल्या मनात.
जरूर भेटु, मी तुमच्यासाठी काढीन वेळ. हे मात्र स्पष्ट, तीला ऐकू येईल असे.
मुक्काम कुठे असणार?
माझ्या मैत्रिणीकडे.
तुम्ही मैत्रीणीचा अॅड्रेस पाठवा. मी घ्यायला येईन, आपण डिनरला जाऊ.
अबोली अॅड्रेस टाइप करत होती. एरीया माझ्या घराच्या जवळपासचा वाटला. नो,नो, माझीच सोसायटी, माझाच अॅड्रेस!
मी धास्तावलो. गप्पांच्या ओघात मी मुद्दामच सांगितले होते की आईवडील माझ्यासाठी मुली बघताहेत, मला कुणी पसंतच पडत नाही कारण मला फक्त सुंदर नाही, पण हुशारही मुलगी हवीय, अगदी तुमच्यासारखी.
अबोलीची मैत्रीण माझ्या ओळखीचीच नव्हे, तर माझीच सौभाग्यवती होती.
जगलो, वाचलो तर सांगेन पुढे काय झाले ते!
stay connected