सौरभ जाधव एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात आदर्श ठरला

 सौरभ जाधव एका शेतकऱ्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट बनून देशभरात आदर्श ठरला



आष्टी प्रतिनिधि 


सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सौरभ सतीश जाधव यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षेत यश संपादन करून आष्टी व पंचक्रोशीचा लौकिक वाढवला आहे. पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या सौरभने आपल्या जिद्द, मेहनत, आणि चिकाटीच्या जोरावर हे कठीण आव्हान पेलले आहे.



सौरभ जाधव यांनी जगातील कठीण मानल्या जाणाऱ्या सीए परीक्षेत दोन्ही ग्रुप यशस्वीरीत्या पास केले. अत्यंत साध्या परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या सौरभने आपल्या मेहनतीने आणि कष्टाने कुटुंबाचे तसेच गावाचे नाव मोठे केले आहे. त्यांच्या यशामुळे पंचक्रोशीतील तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


सौरभच्या सन्मानार्थ आष्टीत आयोजित सत्कार सोहळ्यात सौरभ चे वडील सतिश जाधव, समाजसेवक अशोक अण्णा पोकळे, सिध्दीविनायक उद्योग समूहाचे मालक रमेश भोगाडे,  डॉ. सखाराम वाढरे, डॉ. रवी सातभाई, सिताराम हंबर्डे, योगेश बोराडे आकाश भोगाडे उद्धव भोगाडे आणि सुशिल हंबर्डे यांनी त्याचा सन्मान केला. गावातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव करत आनंद व्यक्त केला.


सत्कार सोहळ्यात अशोक अण्णा पोकळे म्हणाले, "सौरभचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याने केवळ आपल्या कुटुंबाचे नाही, तर संपूर्ण समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे."



यावेळी 

सौरभ जाधव म्हणाले, "माझ्या यशाचे श्रेय आई-वडिलांच्या त्यागाला आणि गुरुजनांच्या मार्गदर्शनाला आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्न साकार करण्यासाठी कष्ट आणि चिकाटीची गरज असते."


सौरभचा प्रवास ‘शून्यातून शिखराकडे’ जाण्याचा आदर्श ठरला आहे. त्यांच्या या यशामुळे पंचक्रोशीतील तरुणांना एक नवी दिशा मिळाली आहे. सामान्य परिस्थितीतही मोठे यश मिळवता येते, हे सौरभने सिद्ध करून दाखवले.


संपूर्ण आष्टी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी सौरभच्या यशाचा आनंद साजरा करत त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.