आष्टी पोलिस ॲक्शन मोड मध्ये
जनावरांसह देशी-विदेशी दारू पकडली, ३० वाहनांवर ही केली कारवाई
आष्टी ता २५ (प्रतिनिधी)- शहरातील दर्गा परिसरामध्ये चार बैल व एक जर्सी गाय कत्तल करण्याच्या उद्देशाने झुडपामध्ये बांधलेले असल्याची खबर आष्टी पोलिसांना समजताच आष्टी पोलिसांनी मंगळवारी (ता २४) सदरील ठिकाणी छापा मारला असता त्यांना ३ लाख १० हजार रुपये किंमतीचे वरील जनावरे आढळून आले. याप्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कडा पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या निमगाव चोभा येथे हॉटेल शंभू मध्ये विनापरवाना देशी विदेशी दारूची चोरटी विक्री करताना आढळून आल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात येऊन ५ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तसेच ३० दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली. सदरील कारवाईने आष्टी पोलिसांनी अवैध धंद्या विरोधात कंबर कसली असल्यामुळे अवैध धंदे करणारामध्ये खळबळ उडाली आहे.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर बीड जिल्ह्यातील सर्व ठाणे प्रमुखांच्या बैठका घेऊन जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावेत अशा सूचना केल्या.
आष्टी तालुक्यामध्ये मागील अनेक दिवसापासून कत्तलखाने बंद आहेत. मंगळवारी आष्टी शहरातील दर्गा परिसरातील झुडूपामध्ये 3३ लाख १० हजार रुपये किमतीचे ४ बैल व १ जर्सी गाय कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. याप्रकरणी आष्टी पोलिसांनी शाकीर युसुफ कुरेशी (वय ५१) राहणार कुरेशी गल्ली, आष्टी याच्यावर अशोक नानासाहेब तांबे (पोलीस शिपाई) यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सर्व जनावरांना खंडेश्वरी गोशाळा कुसळंब (ता पाटोदा) येथे पाठवण्यात आले आहे. तर कडा पोलीस चौकी अंतर्गत शेरी ते शिराळ फाटा रस्त्यावरील निमगाव शोभा शिवारातील हॉटेल शंभू या हॉटेलमध्ये देशी विदेशी दारूची विक्री करताना आढळून आली. यावेळी ५ हजार ३६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी सचिन देविदास गिर्हे (वय ३४) रा. निमगाव चोभा याच्या विरुद्ध पोलीस शिपाई सचिन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच नंबर प्लेट नसलेले, हेल्मेट न घातलेले, परवाना नसलेले व इतर अशा ३० दुचाकीस्वारांवर कारवाई करत १५ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या कारवाईमुळे आष्टी तालुक्यात खळबळ उडाली आहे.
----------------
stay connected