जामखेडचा प्रारूप विकास आराखड्याच्या निषेधार्थ जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे धरणे आंदोलन संपन्न
मंगळवारी जामखेड बंद सहाय्यक संचालक नगर रचनाकार व मुख्याधिकारी बरोबर चर्चा निष्फळ
-------------------------------------------------------
जामखेड - जामखेड शहर विकासाचा केलेला आराखडा हा चुकीचा असून पुर्णपणे रद्द करावा या मागणीसाठी नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. दुपारी चारच्या सुमारास सहाय्यक संचालक अहमदनगर पुनम पंडीत व मुख्याधिकारी अजय साळवे समवेत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याने मंगळवारी जामखेड बंद ठेवण्याचा निर्णय जामखेड बचाव कृती समितीने घेतला आहे.
जामखेड शहराचा प्रारूप आराखडा रद्द करावा या मागणीसाठी जामखेड तहसील कार्यालयासमोर जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी अकरा वाजता धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी नगरसेवक अमित चिंतामणी, पवनराजे राळेभात,अमित जाधव, डिगांबर चव्हाण, वकील संघाचे अध्यक्ष ॲड. शमा हाजी कादर, उद्योजक सोमनाथ पोकळे, डॉ. संजय राऊत, जावेद सय्यद, विजय गव्हाणे, आकाश बाफना, अमोल गिरमे, राजेंद्र देशपांडे, विजय गुंदेचा, नय्युम शेख आदिंसह जामखेड शहरातील विविध राजकीय पक्षसंघटना प्रतिनिधी, व्यवसाईक व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
धरणे आंदोलन दरम्यान सायंकाळी चार वाजता सहायक संचालक नगररचना अहमदनगर पुनम पंडीत यांनी मोबाईलवरून धरणे आंदोलकाशी चर्चा केली सध्याचा जामखेड शहर विकास आराखडा हा प्रारूप स्वरूपाचा आहे. दि. २८ व २९ रोजी गठीत नियोजन समितीसमोर हरकत व सुचना घेतलेल्यांनी म्हणने मांडण्यास उपस्थित राहण्यास सांगितले आहे. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल व नंतर तो सरकारला सादर केला जाईल असे सांगितले. तसेच मुख्याधिकारी अजय साळवे यांनी सध्याचा प्रारूप आढावा अंतिम नाही. गठीत नियोजन समितीसमोर हरकती व सुचना मांडल्यानंतर सर्वांना आवश्यक तो निर्णय घेतला जाईल असे सांगितले परंतु यावर जामखेड बचाव कृती समितीचे समाधान झाले नाही.
जामखेड प्रारूप विकास आराखडा कृती समितीचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात म्हणाले, सध्याचा विकास आराखडा चुकीचा आहे यामुळे अनेक नागरीक बाधीत होत असून त्यांचे मोठे नुकसान होणार आहे. आम्ही मुख्याधिकारी अजय साळवे यांना बाधीत नागरिकांची यादी देण्यास सांगितले परंतु त्यांनी भुमिअभिलेख कार्यालयाकडुन घ्या म्हणून सांगितले. चार दिवस अगोदर निवेदन दिले होते. आम्हाला वाटले ते काहीतरी निर्णय घेतील पण त्यांचा सुर सहकार्याचा नाही त्यामुळे आम्हा सर्वांचे समाधान झाले नाही म्हणून उद्याचा जामखेड बंद निर्णय घेतला आहे असे राळेभात म्हणाले.
stay connected