आष्टी तालुक्यात 'ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रे'चे जंगी स्वागत
ओबीसी आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यावर जेसीबीतुन पुष्पवृष्टी करत फटाक्यांची आतिषबाजी
आष्टी मतदारसंघात ओबीसीचाच आमदार होणार
आष्टी प्रतिनिधी-ओबीसी आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा काढण्यात येत आहे. मंगळवार दि .२३ जुलै रोजी आष्टी तालुक्यात सायं ७ वाजण्याच्या दरम्यान या यात्रेचे आगमन धामणगांव, खिळद,केरुळ, कडा, जळगांव, आष्टी ,सोलेवाडी या गावांमध्ये होऊन ठिकठिकाणी महिलांनी ओबीसी योद्धे यांचे औक्षण केले. प्रा.लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्यावर जेसीबीतुन पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतिषबाजी केली. रात्री १२ वाजेपर्यंत ठिकठिकाणी ओबीसी समाज बांधवानी स्वागतासाठी गर्दी केली होती. यावेळी लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आणि मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. गावगाड्यातील १८ पगड जातीतील नागरीकांनी एकत्र येण्याची गरज आहे व एकजुट होण्याचे आवाहन यावेळी केले.
आष्टी तालुक्यात ओबीसी आंदोलक प्रा.लक्ष्मण हाके,नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या "ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रा" धामणगांव येथे मंगळवारी सायं ७ वाजता आगमन झाले. दोन्ही ओबीसी योद्धे यांच्यावर जेसीबीतून पुष्पवृष्टी करण्यात आली डी.जेच्या आरक्षण विषयक गाणी, मुंडे साहेब, छगन भुजबळ, पंकजा मुंडे, विविध १८ पगड जाती धर्मातील गाणी व लोकनेत्यांच्या गाण्यावर तरुणाई थिरकली. मोठ्या उत्साहात ओबीसी समाज बांधव तरुणाई ओबीसी योद्धे यांचा सत्कार व फोटो घेण्यासाठी गर्दी करत होते.धामणगांव ते खिळद पर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली प्रा .लक्ष्मण हाके यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेला हाताने वर उंचावून डोक्यावर घेत रॅलीत सहभागी झाले होते. खिळद येथील ओबीसी बांधवांनी वडीगोद्री येथील आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता त्यांचे प्रा.लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांनी आभार मानून उपस्थित समाज बांधवांना संबोधित केले. केरुळ येथे फटाक्यांची आतिषबाजी करत जंगी स्वागत करण्यात आले. कडा येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व जळगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .यावेळी ओबीसी बांधवांनी स्वागतासाठी गर्दी केली होती.तेथून पुढे रात्री १२ वाजले तरी आष्टी शहरात शेकडो ओबीसी बांधव उपस्थित राहून स्वागत केले व सोलेवाडी येथे देखील फटाक्यांची आतिषबाजी व जोरदार स्वागत करण्यात आले.सोलेवाडी ग्रामस्थांनी भोजन व्यवस्था केली होती.व येथे यात्रेच्या कालच्या दिवसाचा शेवट झाला शेकडो गाड्यांच्या ताफ्यासह ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
_________
आष्टी तालुक्याचा आतापर्यंत एकही आमदाराने ओबीसी आंदोलनाला पाठिंबा दिला नाही त्यांना जागा दाखवून द्यायची
मराठा आंदोलनास पाठिंबा दर्शविण्यासाठी आमदार खासदारांनी पाठिंबा पत्र दिलय. ओबीसी आरक्षणावर एकही माईकालाल बोलायला तयार नाही. आष्टी तालुक्यातील पाठिंबा दिलेल्या आमदारांचे नावे घेऊन त्यांना जागा दाखवून द्या. ओबीसीचाच आमदार करा, मोठा भाऊ-भाऊ म्हणतेत अन् आपल्या ताटातल ओढल जातय, आपले उमेदवार पाडण्याचे काम केले. आता १५० पेक्षा जास्त आमदार पाडण्याचे काम करायचे असून ती वेळ आली आहे. आपले पाडले आता त्यांचे पाडा. लबाड मुख्यमंत्री ज्या बाळासाहेबांनी यांना मोठ केलं त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. माझ्या समाजाच्या विरोधात षडयंत्र करतात त्या नेत्यांना घरी पाठविल्याशिवाय राहणार नाही. सोडायच नाही त्यांना जागा दाखवून द्यायची, आष्टी मतदार संघात ओबीसीचा आमदार झाला पाहिजे असे ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यावेळी म्हणाले.
_________
आपलं आरक्षण गेलंय, टिकवायच असेल तर जागं व्हाव लागेल, आमदार खासदार यांनी ओबीसी आरक्षणाला पाठिंबा दिला नाही. आपण कुणाच्या ताटातल आरक्षण मागितल नाही, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला आरक्षण दिल ते टिकले पाहिजे. आरक्षण चाललय तुम्ही आम्ही एक आलो नाही तर पुढची पिढी माफ करणार नाही. ओबीसी हक्काच ताट उध्वस्त करण्याचे काम जरांगे पाटील करतायत. तुमचं आणि ओबीसींचं भांडण नाही तर मग ओबीसीमधून आरक्षण का पाहिजे? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी नाव न घेता जरांगेंना विचारला. सगेसोयरेंच्या माध्यमातून आरक्षण संपवण्याचा घाट आहे. आतापर्यंत किती कारखाने, बँका आम्हाला दिल्या. हि वर्चस्ववादाची लढाई आहे, गरजवंताची नाही असा थेट हल्ला हाके यांनी मनोज जरांगेंवर केला.
_______
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल
प्रविण दरेकर म्हणतात मनोज जरांगेसाठी आम्ही काय नाही केलं. एकीकडे अण्णासाहेब पाटील मंडळाला बिनव्याजी कर्ज का दिलं? दुसरीकडे तालुक्याच्या ठिकाणी ओबीसींचं एकही वसतिगृह नाही. जरांगे पाटलांना ज्या लेटर हेडवर पाठिंब्याचं पत्र दिलंय, तस आम्हाला देणार का? कोण आहेत पंडित? असा सवाल लक्ष्मण हाकेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारला आहे.








stay connected