बाबूजींचा संगीतमय प्रवासपट 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर

 बाबूजींचा संगीतमय प्रवासपट 'स्वरगंधर्व सुधीर फडके' चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर




बाबूजी म्हणजे सुधीर फडके या स्वरगंधर्वाचा संगीतमय प्रवास 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाद्वारे लवकरच रुपेरी पडद्यावर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या या चित्रपटाचे महाराष्ट्र दिनी १ मे रोजी प्रदर्शन होत आहे.


सुधीर फडके यांच्या आयुष्यातील संगीतमय प्रवास, गीत रामायणाची सुरुवात आणि त्यांचे गाणे कसे सुरु झाले, हे सगळं प्रेक्षकांना आणि रसिकांना रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. त्यांच्या सूरांनी आणि गाण्यांनी देशाला मंत्रमुग्ध केले, गीत रामायणाने प्रत्येक संगीतप्रेमींच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबूजींच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाद्वारे आपल्या समोर येणार आहे.


सौरभ गाडगीळ प्रस्तूत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे निर्मात सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटात बाबूजींच्या भूमिकेत सुनील बर्वे दिसणार असून मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीसचिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धिरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नुकताच 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझरमधील "जे माझ्या मनाला भावतं, ते माझ्या संगीतातून, माझ्या गळ्यातून उतरतं...', 'पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून ती आर्तता माझ्या स्वरात उतरते...' या स्वगतातून या स्वरगंधर्वांच्या व्यक्तिमत्वाची ओळख होते. या चित्रपटात आशा भोसले यांनी देखील बाबूजींच्या आठवणी सांगितल्या आहेत.













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.