Crime News : अत्याचार प्रकरणी आरोपी पोलीस शिपायाला अटक : न्यायालयाने सुनावली तीन दिवसांची पोलीस कोठडी
आष्टी प्रतिनिधी -
पोलिस शिपायाने मुंबईवरून गावी येऊन नातेसंबंधातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना फेब्रुवारी महिन्यातील 'प्रॉमिस 'डे' च्या दिवशी घडली होती. याप्रकरणी गुरुवारी (१५ फेब्रुवारी) आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून फरार असलेल्या मुख्य आरोपीस पोलिसांनी गुरुवारी (ता.२८) रात्री ताब्यात घेतले. आरोपी पोलीस शिपाई कर्मचाऱ्याचे नाव विजय खेडकर असून त्यास न्यायालयाने सोमवार (ता.१) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आष्टी तालुक्यातील एका गावातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर नातेसंबंधातील एका नवप्रविष्ट पोलिस शिपायाने मुंबई येथे कार्यरत असताना रविवारी (११ फेब्रुवारी) गावी येऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. याकामी त्याच्याच गावातील दोन मित्रांनी त्याला मदत केली होती. आष्टी पोलिस ठाण्यात गुरुवारी (१५ फेब्रुवारी) रोजी अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून आरोपी विजय खेडकर हा फरार होता. १५ दिवसांपूर्वी पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर यांच्या पथकाने वेशांतर करत थेट उसाचा फड गाठला. टॅक्टरवर चालक म्हणून काम करत असलेला समीर खेडकर व जवळच गॅरेजवर काम करत असलेला हरिओम खेडकर या गुन्ह्यात मदत करणाऱ्या दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. तर आष्टी तालुक्यातील सांगवी आष्टी गावात मुख्य आरोपी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी त्याच्या गुरुवारी (ता.२८) रात्री मुसक्या आवळल्या. ही कारवाई पिंक पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक धरनीधर कोळेकर, पोलीस हवालदार शरद टेकाळे, मुद्दसर शेख, नितीन साप्ते यांनी केली. आरोपी पोलिस शिपायाने बीड न्यायालयात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायायलयाने तो जामीन अर्ज फेटाळला होता. शुक्रवारी (ता.२९) सदरील आरोपीला बीड जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवार (ता.१) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
stay connected