देशाला देश बनवणे हेच सर्वात मोठे आव्हान - Amar Habib
पुणे (वार्ताहर):
देशाला देश बनवणे हेच आजचे सर्वात मोठे आव्हान आहे. स्वदेश निर्मितीचा पाया सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी घातला. महात्मा फुले, राजा राममोहन रॉय आदी समाजसुधारकांनी सामाजिक भेदभाव दूर करण्यासाठी प्रयत्न केले. गांधीजींनी भारतात मोठ्या प्रमाणावर देशभक्ती जागवली.
'देश' म्हणजे काय? देश हा केवळ भौगोलिक प्रदेश नसून तो त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या एकत्र राहण्याच्या प्रबळ इच्छेने तयार होतो.
गांधीजींची हत्या हा देशाला देश बनवण्यात पहिला अडथळा ठरला. गांधीजी अजून काही वर्षे जगले असते तर भारत देश बनण्यातील अडथळे दूर करता आले असते. स्वातंत्र्यानंतर सरकारांनी केलेल्या घटनादुरुस्त्यामुळे आणखी दुसरा अडथळा निर्माण झाला. तिसरा अडथळा आपली निवडणूक पद्धती बनली. अमर हबीब पुढे म्हणाले की, आपल्या निवडणूक पद्धतीत आमूलाग्र बदल व्हायला हवा. मतदान एका ऐवजी सात दिवस चालावे, जेणेकरून भावनेच्या आधारे मतदान होणार नाही. कोणत्याही लोकप्रतिनिधीला फक्त दोन टर्मपेक्षा जास्त संधी देऊ नये. निवडणूक निकालात नोटा (NOTA) मतांना स्थान असले पाहिजे. निम्मे लोकप्रतिनिधी राज्य आणि देशपातळीवर निवडून आले पाहिजेत. प्राधान्यक्रम निवडणूक पद्धती राबविण्याबाबत ते बोलले.
धर्मावर आधारित राष्ट्र ही संकल्पना कालबाह्य झाली आहे. जगाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा घेतला तर धर्माच्या आधारे उभारलेले देश प्रगती करू शकत नाहीत हे स्पष्ट होते. असे मत आंतर भारतीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अमर हबीब यांनी व्यक्त केले. शनिवारी सायंकाळी पुणे आंतर भारतीतर्फे आयोजित ऑनलाइन व्याख्यानमालेत ते बोलत होते. विषय होता- देशासमोरील आव्हाने आणि आपण.
पुढे संबोधित करताना अमर हबीब जी म्हणाले की, सध्याचे राज्यकर्ते हुकूमशाहीकडे वाटचाल करत आहेत. ते लोकांच्या मनात भेदभाव पसरवत आहेत. भावी पिढीच्या हाती आपण कोणता आणि कसा देश सोपवणार आहोत, अशी भीती वाटत आहे. लोकांच्या मूलभूत हक्कांचा संकोच केला गेला आहे. आपली निवडणूक पद्धती लोकशाही नव्हे तर बहुमतशाही सत्ता स्थापन करते; याचे परिणाम जनतेला भोगावे लागत आहेत.
अमर हबीब पुढे म्हणाले की, पुनर्जागरणानंतर धर्म आणि सत्ता वेगळे झाले. आता आर्थिक शक्तीला सत्तेच्या तावडीतून मुक्त होत आहे.
शिवाजी महाराजांची धोरणे, महात्मा फुलेंची शिकवण, महात्मा गांधींच्या विचारांची आणि कार्याची दिशा, साने गुरुजींची मूल्ये पुढे नेणे यातूनच हे राज्य देश म्हणून घडणार आहे. जगाचे खरे सर्जक महिला आणि शेतकरी यांना स्वातंत्र्य बहाल केले तरच देश खऱ्या अर्थाने देश बनू शकेल. अशा प्रकारे अमर हबीब जी यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात उदगीरचा बालकलाकार अर्णव बिरादार याच्या ‘केव्हा तरी पहाटे’ या सुरेल मराठी भावगीताने झाली. हितेंद्र चौधरी यांनी प्रमुख वक्ते अमर हबीब जी यांचा परिचय करून दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर बागुल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुणे अंतर भारतीचे सचिव राम माने तसेच राष्ट्रीय सचिव डॉ.डी.एस.कोरे, पुणे शाखेच्या अध्यक्ष अंजली कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. यावेळी अंतर भारतीचे अध्यक्ष पांडुरंग नाडकर्णी, संगीता देशमुख, मनिषाराणी आर्य, संजयकुमार माचेवार, अमृत महाजन, आरिफ बेग, नत्थुशाह फकीर,
बिरबल यादव, शिवलिंग मठपती, नरसिंग देशमुख, रामकृष्ण आप्पा रुद्राक्ष, अलाउद्दीन सय्यद आदी देशाच्या विविध भागातून ऑनलाइन उपस्थित होते.



stay connected