राज्य ग्रंथालय संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न.
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे 58 वे वार्षिक अधिवेशन श्री क्षेत्र आळंदी जिल्हा पुणे येथे संपन्न झाले. यासाठी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाने पुढाकार घेऊन दिनांक 20 व 21 फेब्रुवारी रोजी आयोजित केलेल्या दोन दिवशीय अधिवेशनाचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज,सरस्वती देवी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलाने शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार,महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी दीप प्रज्वलन केले. उद्घाटन समारंभ प्रसंगी श्री गाडेकर म्हणाले की ग्रंथालय संघाच्या सतत केलेल्या मागणीप्रमाणे सन 2012 पासून बंद असलेल्या नवीन ग्रंथालयांना परवानगी व दर्जा वाढ यासंबंधी शासन सकारात्मक असून लवकरच निर्णय होईल. राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार म्हणाले की,शासनाने गाव तेथे ग्रंथालय ही चळवळ वाढविणे ऐवजी दुर्लक्षित केली आहे. तटपुंजे अनुदान, जाचक अटीमुळे दरवर्षी हजारो ग्रंथालय बंद होत आहेत, म्हणून सरकारने आमच्या सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा.याप्रसंगी माजी आमदार उल्हास पवार, गंगाधर पटणे, पुणे विभाग ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विजय कोलते यांनी मनोगत व्यक्त केले. उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा व पुणे विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह सोपान पवार यांनी प्रास्ताविक केले. ग्रंथालय अधिवेशनात आळंदीचे शांती ब्रह्म ह.भ.प.मारुती बाबा महाराज कुरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. श्री कुरेकर महाराजांच्या मानपत्राचे वाचन नरहरी महाराज चौधरी यांनी केले. पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मोहन महाराज शिंदे यांनी कुरेकर महाराजांचा अल्पपरिचय करून दिला. या समारंभाला सहाय्यक ग्रंथालय पुणे सौ. शालिनी इंगोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले, माजी राज्य अध्यक्ष डॉ. रामेश्वर पवार,अनिल बोरगमव, माजी संचालक मिश्रा, राज्यातील माजी संचालक,राज्यातील विभाग अध्यक्ष व प्रमुख कार्यवाह उपस्थित होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष हनुमंत देवकर,सहकार्यवाह राजेंद्र ढमाले, मार्कडेय मल्लया मिठापल्ली, संतोष गोफणे, चंद्रशेखर कपोते, पुणे विभाग ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष अरुण दांगट, कोषाध्यक्ष रमेश सुतार, बाबासो ठाकूर यांनी पुढाकार घेतला.


stay connected