सख्या भावाच्या मारहाणीत सैनिक भावाचा मृत्यू वाघळूज येथील घटना

 सख्या भावाच्या मारहाणीत सैनिक भावाचा मृत्यू
वाघळूज येथील घटना



आष्टी  (प्रतिनिधी)- तालुक्यात एका अट्टल दरोडेखोराचा चाकूने भोसकून व दगडाने ठेचून खून केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी (ता.८)  पैशाच्या वादावरून दोन सख्या भावांत वाद झाला. यात सैनिक असलेल्या मोठ्या भावाला बेदम मारहाण केल्याने त्याचा शनिवारी (ता.९) मृत्यू झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील वाघळूज येथे घडली. याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अवघ्या ४८ तासात  दरोडेखोरानंतर सैनिकाचा खून झाल्याने आष्टी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

प्रवीण विनायक पवार (वय ३९) रा. वाघळूज ता. आष्टी असे मृत झालेल्या सैनिकाचे नाव असून प्रवीण हे झारखंड येथे सीआरपीएफ मध्ये नोकरीला असून पंधरा दिवसांपासून सुट्टीवर गावी आले होते. शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास प्रवीण व त्यांचा लहान भाऊ विनोद यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणीवरून वाद झाला होता. यात प्रवीणला बेदम मारहाण करण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ अहमदनगर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतू शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.

सदरील घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी रूग्णालयात धाव घेतली. तसेच घटनास्थळाचाही पंचनामा केला. याप्रकरणी प्रवीण यांच्या पत्नी सीमा पवार यांच्या फिर्यादीवरून सासू झुंबरबाई पवार, सासरे विनायक पवार, भावजयी सोनाली पवार, दीर विनोद पवार यांच्या विरोधात अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विनोद पवार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ भडके हे करत आहेत.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.