गाव विकणे आहे - खडकवाडी गाव ग्रामस्थांनी काढले विक्रीला
बीड जिल्ह्यातील ग्रामस्थांनी गाव विक्रीला काढले आहे. बीडमधील पाटोदा तालुक्यातील खडकवाडी गाव विक्रीसाठी काढले आहे. या गावात 1800 ग्रामस्थ राहतात. कारण या गावाचा विकास केवळ कागदावरच झाला आहे. ज्या प्रमाणे ‘जाऊ तिथे खाऊ’ चित्रपटात विहीर केवळ कागदावरच झाली होती, त्या प्रमाणे गावाचा विकास कागदावर करण्यात आला आहे. विकासासाठी आलेला निधीतून गावातील प्रमुख आणि इतर अधिकाऱ्यांनी आपले खिसे भरल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला.
गावकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून गाव विक्रीचे बॅनर लावले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, आपण अनेक महत्त्वाकांक्षी योजना आणल्या आहेत. राज्याला आपण विकासाकडे नेत आहात. मात्र आमचे खडकवाडी गाव विकासापासून कोसो दूर आहे. शासनाने सुरू केलेल्या सर्व विकास योजना आणि प्रकल्प गावात केवळ कागदावरच आहेत. गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीतून कोणतेही काम झाले नाही. यासंदर्भात तक्रारी केल्यावर त्याची दखल घेतली गेली नाही. यामुळे आम्हाला हे गाव विकायचे आहे, त्यासाठी तुम्ही आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे
.
stay connected