राज्यातील ३० टक्के दुधात भेसळ ; ... तर त्या दूध संघांचे परवाने रद्द करू -राधाकृष्ण विखे-पाटील
राज्यभरात दुधाला चांगला दर मिळावा यासाठी दुध उत्पादकांच्या मागणीने जोर धरला आहे . अॅड प्रदिप चव्हाण यांनीही दुध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी उचलून धरत मोर्चा काढला तसेच माहिती अधिकारातून वस्तुस्थिती समोर मांडली . याबाबत महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दखल घेतली आहे .
दुधाला ३४ रुपये दर मिळावा, या प्रश्नावर राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, ‘‘काही दूध संघ, काही खासगी संस्था सरकारचा आदेश पाळत नाहीत, अशी तक्रार आहे. त्यासाठी खासगी, सहकारी दूध संघांची बैठक घेतली. त्यास उपोषणकर्ते अजित नवले, रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनाही बोलविले होते. मार्ग काढण्याचा मी प्रयत्न करतोय.
दुधाचे बटर आणि दूध पावडरीचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोसळल्याने भाव देता येत नाही, असे सांगितले जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. महाराष्ट्रात ३० टक्के दुधात भेसळ आहे. ही भेसळ रोखू शकलो तरी दुधाला चांगला दर देता येईल.’’
‘...तर दूध संघांचे परवाने रद्द’
मंत्री विखे-पाटील म्हणाले, ‘‘दूधदर प्रश्नासंदर्भात मी खासगी, सहकारी दूध संघांशी चर्चा करतोय. येत्या दोन-तीन दिवसांत अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तरीही खासगी आणि सहकारी दूध संघ सरकारचे ऐकणार नसतील, तर त्यांचे परवाने रद्द करण्याबाबत कठोर निर्णय घ्यावा लागेल,’’ असा इशारा मंत्री विखे-पाटील यांनी दूध संघांना दिला.
stay connected