दि. १३/१०/२०२३
नोटीस
समता परिषदेच्या मेळाव्यात 'मराठा - समाजाबद्दल खोटे व अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल छगन भुजबळ यांना नोटीस
प्रति,
श्री. छगन चंद्रकांत भुजबळ, रा. चंद्राई बंगला, भुजबळ फार्म, मुंबई - आग्रा हायवे, नाशिक, ता. जि. नाशिक. -
विषय दि. १२/१०/२०२३ रोजीच्या समता परिषदेच्या मेळाव्यात 'मराठा - समाजाबद्दल खोटे व अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल नोटीस
मा. महोदय,
आमचे अशिल श्री. सतिश भास्कर काळे, रा. ११, आनंद रेसिडेन्सी, कन्हैया पार्क, थेरगाव, पुणे यांनी दिलेल्या माहितीवरुन व सांगीतलेवरुन आपणास पुढीलप्रमाणे नोटीस देण्यात येते कि -
१. आमचे अशिल हे महाराष्ट्रातील मराठा समाजाचे प्रथितयश संघटक आहेत. ते सकल मराठा समाजाच्या सर्व उपक्रम व आंदोलनात सक्रियपणे सहभागी असतात. ते सध्या संभाजी ब्रिगेड या संघटनेचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षपदी कार्यरत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी त्यांनी नुकतेच ७ सप्टेंबर २०२३ रोजी पासुन ९ तारखेपर्यंत पिंपरी चिंचवड येथे आमरण उपोषण केले होते व उपोषणाने तब्येत खालावल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.
२. तुम्ही सध्या महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री आहात.
३. मराठा आरक्षणाची मागणी हि कोणत्याही जातीच्या किंवा व्यक्तीच्या विरुद्ध नाही, तरी देखील गेल्या काही दिवसांपासुन तुम्ही दोन समाजात (मराठा ओबीसी) तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्ये करत असल्याचे आमचे अशिल हे विविध वृत्तपत्रांमधून व दूरचित्रवाणीवर पाहत आहेत.
४. दि. १४/१०/२०२३ रोजी मौजे अंतरवली सराटी, ता. अंबड, जि. जालना येथे श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सभा हि कोणत्याही पक्षाने अथवा नेत्याने आयोजित केलेली नाही. सदर सभेसाठी कोणीही कसलीही वर्गणी मागितली नसुन कोणतेही प्रायोजकत्व घेतलेले नाही. हि बाब संपुर्ण राज्याला माहित असताना देखील तुम्ही मुद्दाम व जाणीवपूर्वक दोन समाजात तेढ निर्माण करून स्वतःचा राजकीय फायदा व्हावा या उद्देशाने दि. १२/१०/२०२३ रोजी मुंबई येथे समता परिषद या संघटनेच्या मेळाव्यात भाषण करताना दि. १४/१०/२०२३ रोजी मौजे अंतरवली सराटी येथे आयोजित सभेबद्दल कुचेष्टा करणारी व समस्त मराठा समाजाच्या भावना दुखावणारी वक्तव्ये केली आहेत असे आमचे अशिलांनी TV9 या दूरचित्रवाणीवरील बातमीपत्रात ऐकले आहे. सदरच्या बातमीमध्ये तुम्ही केलेल्या भाषणाची ध्वनिफीत ऐकवण्यात आलेली आहे. सदर ध्वनिफीतीतील वक्तव्ये "... 19 कोटी रुपये मदत झाली आहे.... पैसे येतात कोठुन..... १ हजार, २१ हजार, १० हजार, २० हजार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात इकडे १० रुपये कोणी देत नाही, १० कोटी दिले लोकांनी..... हि धादांत खोटी आहेत. या वक्तव्यामुळे आमच्या अशिलांच्या एक मराठा संघटक म्हणुन व समस्त मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळात मंत्री असुन तुम्ही मंत्री पदाच्या शपथेचा देखील भंग करत आहात.
५. तरी या नोटीसद्वारे आपणास कळवण्यात येते कि दि. १२/१०/२०२३ रोजी मुंबई येथे समता परिषद या संघटनेच्या मेळाव्यात भाषण करताना अंतरवली सराटी येथे आयोजित सभेबद्दल कुचेष्टा करणारी व समस्त मराठा समाजाच्या भावना दुखावणारी केलेली वक्तव्ये त्वरित मागे घेऊन सकल मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा आमचे अशिल तुमच्या विरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई सुरु करतील व त्यामुळे होणार्या सर्व परिणामास तुम्ही सर्वस्वी जबाबदार असाल.



stay connected