" नवरात्र उत्सवात आदिशक्ती बरोबर मातृशक्तीचा जागर "
----------------------------------------
आदिशक्तीच्या जागरचा, गौरवाचा उत्सव असणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाला रविवारी घट स्थापनेने प्रारंभ झाला. हा चैतन्यमय उत्सव साजरा करण्याची लगबग संपूर्ण भारतभर दिसून येते. देश व राज्य भरातील सर्वं देवींचे मंदिरे आदिमायेच्या स्वागतासाठी सज्य झाली आहेत. महाराष्ट्रातील देवीचे साडेतीन शक्तिपीठे व त्यांची गावोगाव असलेली ठानं तसेच मध्य प्रदेश नलखेडा येथील पांडव कालीन मंदिर असलेले बगलामुखी देवीच्या सिद्धपीठात नवरात्र उत्सव मोठ्या भक्ती भावाने सुरु झाला आहे. घरोघरीही देवींची घट स्थापना केली गेली आहे.
खरं तर नवरात्र उत्सव म्हणजे आदिशक्ती, आदिमाया, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, दुर्गा, भवानी किंबहुना संपूर्ण सृष्टीची निर्माती असणाऱ्या शक्ती प्रती आदर भाव व्यक्त करण्याचा उत्सव,
ज्या भूमीवर आपण जन्म घेतला ती आपली भारतमाता, ज्या भूमीवर आपण आपले नीत्य जीवन जगत आहोत ती आपली मातृभूमी, ज्या मातेच्या पोटी आपला जन्म झाला आणी या पृथ्वीवरचे सुंदर असे जीवन आपल्याला जगायला मिळाले ती आपली जन्मदात्री, या सर्वांसमोरच नतमस्तक होऊन या नवरात्र उत्सवात आदिशक्ती बरोबरच मातृशक्तीचाही जागर होणे आवश्यक आहे.
या मातृशक्तीत सवेंदना, वास्तल्य, माया, ममता, प्रेम, जिव्हाळा असूनही वेळेप्रसंगी आपल्या माणसांसाठी क्रोध, विरोध, विद्रोह, धिक्कार, नकार याचेही दर्शन आपल्याला या मातृशक्तीत दिसते. मातृशक्ती ही कायमच अलौकिक व शक्तीशाली ठरली आहे. आपल्या उदरातून नवजीव निर्माण करण्याची क्षमता निसर्गाने तिला दिली आहे म्हणूनच जन्म मृत्यू चे कालचक्र अखंड सुरु आहे.
प्रत्येक कालखंडात मातृशक्तीचे अनेक उदाहरणं आपल्या इतिहासाच्या प्रत्येक पानांवर पाहायला मिळतात. संत, महंत, विचारवंत, महापुरुष वा इतर अनेक कर्तृत्वान व्यक्तींना जन्म देऊन घडविणाऱ्या अनेक मातांचा आदर्श कायम आपल्या डोळ्यासमोर आहे. ही मातृशक्ती आपली जन्मदात्री तर आहेच पण ती कधी भगिनी, पत्नी, मैत्रीण, मुलगी यांच्याही स्वरूपात दिसते.
विश्व् कल्याणासाठी जन्म घेतलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या जीवनात निवृत्ती, सोपान या बंधू बरोबरच छोटी बहीण मुक्ताई आदिमायेच्या स्वरूपात आली. संत ज्ञानेश्वराना ज्यावेळी या चुकीच्या स्वार्थी जगात जगायचा कंटाळा आला, मन उदास निराश झाले त्याच वेळी छोटी मुक्ताई त्यांना म्हणते अहो ज्ञानदेवा तुम्ही योगी आहात, पावन मनाचे आहात म्हणूनच लोकांच्या चुका, चुकीचे वागणे आपण सहन करायचे त्यांना क्षमा करायची, आपल्या रागामुळे कुठलेही चुकीचे कृत्य आपल्या हातून होता कामा नये, आपणच असे निराश झालात तर जन कल्याण कोण करणार, यावेळी ती लहान बहीणच इथे संत ज्ञानेश्वर यांची मार्गदर्शिका बनते.
छत्रपती शिवाजी महाराज या महापुरुषाला घडवत असताना आपल्या उपजत संस्काराचे बाळ कडू पाजवत माँ साहेब जिजाऊ म्हणतात माझ्या उदारातून जन्म घेलतेली ही संतती देशाची, राष्ट्राची आहे त्याच भूमिकेतुन जिजाऊनी शिवबाला वयाच्या सोळाव्या वर्षीचं स्वराज्याचे तोरण बांधण्यास सज्य केले. शिवाजी महाराजांच्या सर्वं पराक्रमात माँ जिजाऊ चीं मातृशक्ती खंबीरपणे त्यांच्या मागे उभा होती.
वयाच्या तेवीसाव्या वर्षी हसत हसत फाशीवर चढणाऱ्या भगतसिंगाची प्रेरणा त्यांची आई विद्यावती व मावशी सरसवती होती. पाठीवर आपला पुत्र बांधून मेरी झासी नही दूंगी अशी गर्जना करून रणागनांत लढणारी झासीचीं राणी ही एक मातृशक्तीच होती. आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या सासऱ्याचा वारसा सक्षम चालवून जनतेची माऊली बनलेल्या अहिल्यादेवी होळकर या सुद्धा जन सेवेसाठी स्वतःला समर्पित करणाऱ्या मातृशक्तीच ठरल्या . देशभक्त सावरकरांच्या कामात आपला खारीचा वाटा उचलून स्वतःच्या पोटावर बॉम्ब लावून फिरणारी मातृशक्तीच होती.
प्रत्येक क्षेत्रात या मातृशक्तीचं तेज झळकलेले आपल्याला पाहायला मिळते. लाईटच्या उजेडासाठी लागणारा बल्प चा शोध लावणारा एडिसन शाळेत असताना मंद बुद्धी म्हणून हिणवला गेला पण ही बाब त्याच्या मातेने त्याला जाणवू न देता त्याचे शिक्षण घरीच घेऊन एडिसन सारखा महान शास्रज्ञ् या जगाला दिला.
बाळा स्वतःच्या पाया बरोबरच स्वतःच्या मनालाही कोणत्याही प्रकारची घाण लागू देऊ नकोस असे सांगणारी श्यामची आई जगाला नीती मूल्यांचे धडे शिकवून गेली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर सावित्रीमाई व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबर रमाई यांनी खांद्याला खांदा लावून जर त्यांना साथ दिली नसती तर हे महापुरुष घडलेच नसते असे म्हणलं तरी ते वावग ठरणार नाही. माझी राष्ट्रपती व थोर वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम यांना घडवणारी त्यांची माता आणि आताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणजे मातृशक्तीचे उत्तम उदाहरणं होय. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीनीं लोकसभेतील आपल्या भाषणात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना साक्षात दुर्गा देवींची उपमा दिली होती.
मागील इतिहास ते आज पर्यंत या वीर मातृशक्तीचा महापराक्रम सुवर्ण अक्षरानी लिहावा असाच आहे. आजच्या वर्तमान काळातही ही मातृशक्ती आपल्या सर्वांच्या जीवनात कुठल्या न कुठल्या मार्गाने अशीच तळपत आहे. ही मातृशक्ती घरची आणि बाहेरची जबाबदारी मोठ्या कौशल्याने पार पाडते आहे त्यामुळेच अशा या नवरात्री उत्सवाच्या पावन पर्वावर आदिशक्ती बरोबरच या मातृशक्तीलाही त्रिवार वंदन...!!
लेखक -
प्रा. महेश कुंडलिक चवरे,
आष्टी.
मो.9423471324


stay connected