अंभोरा पोलिसांनी मद्य घेऊन जाणारा टेम्पो पाठलाग करून पकडला
तीन लाख एकोनसत्तर हजार आठशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त
आष्टी (प्रतिनिधी)- मद्याचा साठा घेऊन नगर येथून हिवरा पिंपरखेड मार्गे आष्टीच्या दिशेने भरधाव वेगाने छोटा हत्ती टेम्पो जात असताना अंभोरा पोलीसांनी पाठलाग करत रविवारी (ता ८) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पिंपरखेड बस स्थानकावर पकडला. यावेळी सदरील टेम्पो व त्यातील मद्यसाठा असा एकूण ३ लाख ६९ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असून चालक व अन्य एक अशा दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
अंभोरा पोलिसांची नजर चुकवत नगर येथून हिवरा पिंपरखेड मार्गे आष्टीच्या दिशेने छोटा हत्ती टेम्पो (MH 16 AY 3013) हा रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास देशी विदेशी मद्याचे ४२ बॉक्स घेऊन भरधाव वेगाने जात असल्याची माहिती अंभोरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे यांना मिळताच त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेत हिवरा येथील लगड वस्ती जवळ सदरील टेम्पो अडविण्याचा प्रयत्न केला असता सदरील चालकाने टेम्पो न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेला. अंभोरा पोलिसांनी सदरील टेम्पोचा पाठलाग करून पिंपरखेड बस स्थानकावर पकडला. सदरील टेम्पोत विनापरवाना बेकायदेशिररित्या वाहतुक करण्यात येत असलेले विविध कंपनीचे देशी विदेशी दारुचे ४२ बॉक्स आढळून आले. या प्रकरणी रियाज राजु शेख (वय २७) व गोविंद किसनराव चन्ने (वय ३४) दोन्ही रा. केडगाव, ता. जि. अहमदनगर यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. टेम्पो व मद्याचे बॉक्स असा ३ लाख ६९ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी दोन पंचासमक्ष जप्त केला असून पोलीस कॉन्स्टेबल शिवदास केदार यांच्या फिर्यादीवरुन अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाने करत आहेत.


stay connected