आष्टी तालुक्यातील पाच दुध संकलन केंद्रावर दुध भेसळ विरोधी पथकाची धाड
-------------------------------------
आष्टी/प्रतिनिधी
ब्रम्हगांव आणि हाजीपुर येथिल दुध संकलन केंद्रावरील भेसळयुक्त तीन हजार दुध केले नष्ट
तालुक्यातील ब्रम्हगाव आणि हाजीपुर येथिल विविध डेअरींच्या पाच दुध संकलन केंद्रावर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या समितीच्या आणि अन्न भेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. यावेळी हाजीपुर येथिल एक तर ब्रम्हगांव येथिल दोन दुध संकलन केंद्रावरील भेसळयुक्त 3 हजार लिटर दुध नष्ट करण्यात आले असुन इतर दोन दुध संकलन केंद्रावरील दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहे.
नागरिकांना शुध्द दुध मिळावे यासाठी शासन प्रयत्न करत असुन प्रत्येक जिल्ह्यात दुध भेसळ विरोधी समिती स्थापन करण्यात आली आहे. बीडचे अप्पर जिल्हाधिकारी त्रिभुवन कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय भेसळ प्रतिबंधक समिती आणि अन्न भेसळ प्रशासन विभागाच्या संयुक्त पथकाने आष्टी तालुक्यात संयुक्त कारवाई दि.११सप्टेंबर रोजी केली. या कारवाईत हाजीपुर येथील कानिफनाथ खाजगी दुध संकलन केंद्राचे २५८ लिटर दुध, ब्रम्हगाव येथील संत वामनभाऊ या खाजगी दुध संकलन केंद्राचे १७९८ लिटर दुध, जय हनुमान या खाजगी दुध संकलन केंद्राचे ७३८ लिटर दुध असे एकुण ३०२५ लिटर दुधाची तपासणी केली. या तपासणीत संशयास्पद दुध आढळुन आल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नष्ट करण्यात आले. तसेच मातोश्री दुध संकलन केंद्र आणि संजीवनी दुध संकलन केंद्रावर देखील दुधाची तपासणी करण्यात आली. संशयास्पद दुध संकलन केंद्रावरील दुध तपासणीसाठी दुधाचे नमुने घेण्यात आल्याचे समजते.
*या संकलन केंद्रांवर झाली कारवाई*
अन्न सुरक्षा अधिकारी यांनी कानिफनाथ दुध संकलन केंद्र हाजीपुर, संत वामनभाऊ दुध संकलन केंद्र ब्रम्हगाव या दुध संकलन केंद्राचा अन्न परवाना नसल्यामुळे व्यवहार बंद करण्याबाबत सुचना दिल्या. वैधमापन शास्त्र विभागामार्फत आष्टी तालुका दुध संघ मर्या. आष्टी या केंद्रातील वजन काटा प्रमाणीत नसल्यामुळे संघावर कार्यवाही करण्यात आली आहे. कानिफनाथ दुध संकलन केंद्र हाजीपुर व संत वामनभाऊ संकलन केंद्र ब्रम्हगाव या खाजगी दुध संकलन केंद्रावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.
*आष्टी तालुका दुध भेसळ विरोधी समितीच्या रडारवर*
आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होते. त्याच प्रमाणात दुधात भेसळ देखील मोठ्या प्रमाणात होत आहे असे अनेक वेळा समोर आले आहे. या आधीही अनेक वेळा तालुक्यातील दुधाची भेसळ समोर आली आहे. त्यामुळे आष्टी तालुक्यातील दुध संकलन केंद्र आणि दुध उत्पादक शेतकरी भेसळ विरोधी पथकाच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.
भेसळ होत असल्यास माहिती द्यावी
दुग्ध संस्थाना कमीप्रत, वास, खराब चवीचे व भेसळयुक्त् दुध न स्विकारण्याबाबत सक्त् सुचना देण्यात आल्या आहेत. या जिल्हास्तरीय समिती मार्फत दुध, दुग्धजन्य पदार्थाचे भेसळ करणा-या विरुध्द धडक मोहिम राबविण्यात येत असुन सर्व जनतेस आवाहन करण्यात येत आहे की,आपले जवळपास दुध व दुग्धजन्य पदार्थाचे भेसळीचे प्रकार घडत असल्यास आपण जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी बीड या कार्यालयाकडे संपर्क साधावा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.


stay connected