कडा येथील महामार्गावर जीवघेणे खड्डे
कडा/ अनिल मोरे - प्रतिनिधी... आष्टी ते साबलखेड या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मात्र, पावसाने या रस्त्याची पुरती वाट लागली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षाने हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
लेव्हलिंगचे काम कंत्राटदार कंपनीने (महामार्ग) साबलखेडपासून आष्टी पर्यंत सुरू केलेले आहे. मात्र, कडा येथे या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम हाती असल्याने हे काम मागे ठेवण्यात आलेले आहे. रस्ता अतिशय खराब असून सध्या नाल्याचे कामे सुरू आहेत.
मात्र, पूर्वीच्या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी बांधकाम विभागाने कोणतीही दक्षता घेतलेली नसल्याने सध्या काम सुरू असलेल्या या रस्त्यावर चिखल झाला असून वाहने घसरून अपघात होत आहेत. कड़ा शहरात जुन्या बसस्थानकाजवळ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात तर हा रस्ता अतिशय धोकादायक बनला आहे .
गेल्या काही दिवसांत दुचाकी घसरून झालेल्या अपघातांत अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे.
कहा शहरात आंबेडकर चौक व जुन्या बसस्थानकाजवळ मोठ-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहने चालविणे मुश्कील झाले आहे. पावसाचे पाणी खड्ड्यांत साचून अंदाज येत नसल्याने या ठिकाणी दररोज अपघात घडत आहेत. उपाययोजना केली पाहिजे.
- दीपक गरूड, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी
परिस्थितीची दखल घेत पर्यायी व्यवस्था म्हणून तातडीने खड्डे बुजवून घ्यावेत व वाहनधारकांना होणारा मनस्ताप कमी करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे .
stay connected