आष्टी बस स्थानकाची ईमारत झाली जीर्ण , नवीन इमारतीचे बांधकाम कधी पूर्ण होणार ?
आष्टी ता.२७ (बातमीदार)- येथील बस स्थानकाची इमारत जुनी असुन ती पूर्णपणे जीर्ण झालेली आहे. या इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून अनेक ठिकाणी प्लास्टर गळून पडले असून त्यामुळे आतील लोखंडीरॉड स्पष्टपणे दिसत आहे. या इमारतीची दुरावस्था झाल्याने सदरील इमारत शेवटची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे. ईमारत कोसळून जिवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशातुन उपस्थित होत आहे.
गेल्या चार ते पाच वर्षांपासून बस स्थानकाच्या इमारतीचे नवीन बांधकाम संथ गतीने सुरू आहे. बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असून सध्या येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, प्रवाशांना बसायला व्यवस्थित निवारा नाही, प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपात शौचालय उभारले असून त्यात पाण्याची सोय नाही, त्यामुळे प्रवाशी उघड्यावर लघुशंका करताना दिसून येत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने येथे हलका पाऊस पडला तरी देखील येथे चिखल होतो. चिखल तुडवत प्रवाशांना बसची ताटकळत वाट पाहत उभे रहावे लागते. तसेच वराहांचा उपद्रव्य येथे मोठ्या प्रमाणात सुरू असून या परिसरात दुर्गंधी ही पसरली आहे. बस स्थानकामध्ये पूर्वी प्रवाशांसाठी उपहारगृह होते. ते ही मागील अनेक महिन्यांपासून बंद आहे. अशा विविध समस्याने बस स्थानक ग्रासले आहे. रात्री या बस स्थानकावर प्रवाशी उतरले तर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्याचे बसस्थानक जुने असून त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. या जिर्ण इमारतीमुळे प्रवाशात भितीचे वातावरण आहे. इमारत जुनी असल्याने ही इमारत धोकादायक बनली आहे. नवीन इमारतीचे बांधकाम हे संथ गतीने सुरू असून त्याला पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागणार अशी चर्चा प्रवाशी वर्गातून होत आहे.
-----------
stay connected