कडा परिसरात अवैध धंदे जोरात
पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष
आष्टी ता.२६ (बातमीदार) - तालुक्यातील कडा पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरू असून या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत. मात्र 'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीदवाक्य घेऊन उतरलेले पोलीस खाते मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.
कडा परिसरात मागील काही दिवसांपासून विनापरवाना दारू विक्री मटका, जुगार आदी अवैध धंदे बोकाळले असून याकडे पोलीस खाते का दुर्लक्ष करत आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. अगदी पोलिस चौकी पासून हाकेच्या अंतरावर ही मटक्याचे अड्डे राजरोसपणे सुरू असून याठिकाणी ही पोलीस कारवाई करण्याचे धाडस करीत नाहीत. या राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे अनेकांचे संसार धुळीस मिळाले आहेत. तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी गावठी दारू ही सुरू आहे. कड्यातील पोलिसांना हे सर्व प्रकार का दिसत नाहीत ? असा प्रश्नही सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. कडा परिसरात वाळुचा उपसा होत असून अवैध वाळू उपसामुळे अनेक ठिकाणी नदीपात्राचा ऱ्हास होत गेला असून पर्यावरणाला त्यापासून धोका निर्माण होत आहे. कडा परिसरातील सुरू असणाऱ्या अवैध धंद्याकडे पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
stay connected