अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरच्या काठावर असलेल्या वालधुनी नदी संवर्धनासाठी सामाजिक संघटनांनी लक्ष वेधले
Ramesh Kamble Ulhasnagar Reporter
उल्हासनगर :- अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरच्या काठावर असलेल्या वालधुनी नदी संवर्धनासाठी सामाजिक संघटनांनी लक्ष वेधले आहे. उल्हासनगरच्या वालधुनी बिरादरी आणि मुंबईच्या रिव्हर मार्च या सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन नदी संवर्धनाबाबत नारेबाजी करून वालधुनी नदी प्रदूषण मुक्त करा अशी शासनाकडे मागणी केली आहे.
सध्या हिंदू धर्मियांचा पवित्र असा श्रावण महिना सुरू असून यानिमित्ताने येथील प्राचीन शिवमंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांची रीघ लागली आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथ शहराच्या मध्यावर शिवमंदिराजवळून वाहणारी वालधुनी नदी ३० वर्षांपूर्वी स्वच्छ होती मात्र त्यानंतर आनंदनगर एमआयडीसी, अंबरनाथ नगरपालिका, उल्हासनगर म्हणारपालिकांचे सांडपाणी, रासायनिक द्रव्ये नदीत सोडण्यात येऊ लागल्याने ही नदी प्रदूषित झाली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून वालधुनी बिरादरी सारख्या अनेक संघटना वालधुनी नदीच्या संवर्धनासाठी लढा देत आहेत.
वालधुनी बिरादरी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत दायमा, सरिता खानचंदानी, पंकज गुरव, मुकेश माखीजा, हरी चावला, प्रदीप कपुर, कुमार रेड्डीयार, मुंबईच्या रिव्हर मार्च या सामाजिक संघटनेच्या गोपाल ज़वेरी, महेश थावानी, पंकज त्रिवेदी, बजरंग अग्रवाल आदी कार्यकर्त्यांच्या उपस्थित वालधुनी नदीच्या काठावर नदी संवर्धन संबंधात चर्चा सत्राचे आयोजन केले होते, या नंतर वालधुनी नदी वाचवण्यासंबंधित विविध फलक हातात घेऊन नदी संवर्धनबाबत नारेबाजी केली. वालधुनी बिरादरी व मुंबई रिव्हर मार्चच्या कार्यकर्त्यांनी मंदिराचे पुजारी विजू पाटील यांची सदिच्छा भेट घेतली यावेळी त्यांच्याकडून प्राचीन शिवमंदिराचा इतिहास जाणून घेतला.
या संदर्भात शिवमंदिराचे पुजारी विजय चाहू पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की वालधुनी संदर्भात आम्ही देखील प्रयत्नशील असून जर यात सरकारने मदत केली नाही तर आपण स्वखर्चाने नदी संवर्धन करू असे आश्वासन त्यांनी सामाजिक संघटनांना दिले.
stay connected