अग्रलेखाचे विद्यापीठ अनंत हंबर्डे आणि अनंत तरंग ग्रंथ - लेखक - प्रा.सय्यद अल्लाउद्दीन

 अग्रलेखाचे विद्यापीठ अनंत हंबर्डे आणि अनंत तरंग ग्रंथ - लेखक - प्रा.सय्यद अल्लाउद्दीन           

                              

जुलै 2022 मध्ये ज्येष्ठ पत्रकार, प्रसिद्ध साहित्यिक,थोर विचारवंत,गुरुवर्य अनंत हंबर्डे यांच्या काही निवडक अग्रलेख संग्रहाचा ग्रंथ पत्रकार उत्तम बोडखे यांनी रंगाई प्रकाशन,आष्टी या कडून प्रकाशात आणला.ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रहातील अग्रलेखांची निवड नामदेव भाऊ राऊत यांनी केली आहे.एकूण 16 अग्रलेख या ग्रंथात आहेत.त्यात आष्टीच्या इतिहासाचा जिवंत झरा.. रघुनाथराव राऊत,विठ्ठलपंत सहस्रबुद्धे.. लोकनियुक्त न्यायमूर्ती,खेळ आणि राजकारण गाफील पणे खेळू नये,कॉम्रेड नाना पाटलांनी सांगितलेली गोष्ट,आम्ही बलुते,जनतेचे न्यायाधीश... अली पैलवान गेले,भस्मासुराचा उदय.. पण अस्त केव्हा? पवार साहेब! ते असेल हो. पण हे नाही काय?,इस्पीतळा बाहेरील येडे... ह्यांच्या पदव्याच काढून घ्या,पिढी पायऱ्या नसलेल्या दरीत चालली आहे,कुत्रा... एक निबंध,महाराज राज्यसभा म्हणजे राजसत्ता नव्हे,विद्वान आणि विचारवंतांची भीतीच वाटते,मी बीडचा म्हणायची लाज वाटते. असे हे एक से बढकर एक अग्रलेख आहेत. गुरुवर्य अनंत हंबर्डे यांच्या लेखणीचा आवाका फार मोठा आहे.पत्रकार म्हणून त्यांची कारकीर्द पाच दशका पुढची आहे.मराठवाड्यामध्ये जेव्हा दै.मराठवाडा हे अनंत भालेराव संपादित दैनिक फार मोठ्या खपाचे वर्तमानपत्र होते,त्याला एक फार मोठा दर्जा होता.अशा दैनिकामधून अनंत हंबर्डे यांचे लेखन फार मौलिक आणि भरीव होते.विचारवंतांना सुद्धा खोलवर विचार करायला लावणारे होते.एकदा एक विषय घेतला की विषयावर सांगोपांग चर्चा आपणच घडून आणायची.खऱ्या अर्थाने निर्भीडपणा तो त्यांनी अग्रलेखातून त्यावेळी जपला होता.मुंबईहून निघणारे दै.नवाकाळ हे दैनिक अग्रलेखाचा बादशहा म्हणून ओळखले जायचे.नवाकाळ त्याकाळी लोग अगत्यपूर्ण वाचत असत.तसेच मराठवाडा दैनिकातील लेख तंतोतंत नवाकाळची आठवण करून देत.स्वतःच्या साप्ताहिकांमध्ये गेली अनेक वर्षापासून गुरुवर्य अनंत हंबर्डे सरांनी तीच परंपरा आज अव्याहातपणे जपली आहे.त्यांच्या आष्टी चित्रदर्शन साप्ताहिकात गेली अनेक वर्षापासून प्रसिद्ध होणारे अग्रलेख लोक आवडीने वाचतात.आजवर हजारो अग्रलेख त्यांनी लिहिले आहेत.उद्या ते अनेक विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी.चे विषय होतील. अनंत तरंग या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे म्हणतात..., जन्मजात कुशाग्र बुद्धिमत्ता.प्रचंड व्यासंग, ज्ञान मिळवण्याची जिज्ञासा,चौफेर वाचन आणि संस्कृत,मराठी,हिंदी,आणि उर्दू भाषेवर विलक्षण प्रभुत्व असल्यामुळे त्यांनी समाजाच्या मनावर अधिराज्य निर्माण केले. आष्टी चित्रदर्शन या साप्ताहिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या काही अग्रलेखाचे पुनर्प्रकाशन करण्याचा मानस आमचे मित्र नामदेव राऊत आणि उत्तम बोडखे यांनी बोलून दाखवला आणि लगेचच त्यासाठी आम्ही तयारीला लागलो.प्रचंड आत्मशोध वृत्ती आणि गुणग्राहकता हे गुण मूलतः असल्यामुळे तसेच त्यांना नैसर्गिक प्रतिभेची साथ असल्यामुळे लिखाणाला वैभव प्राप्त झालेले आहे.त्यांच्यातील शोध वृत्तीचे आणि कमालीचे निरीक्षण यांचे उत्तम उदाहरण अनेक अग्रलेखांमधून सांगता येतील.तर नामदेव भाऊ राऊत यांनी मातीशी इमान असलेलं अलौकिक व्यक्तिमत्व या शीर्षकाच्या मनोगतात म्हटले आहे...  सामाजिक,अध्यात्मिक,शैक्षणिक आणि राजकीय घडामोडी वर भाष्य करताना त्यांनी अंतरीचे सर्वस्व अर्पण केलेले आहे.आष्टी तालुक्याचा हा चालता बोलता इतिहास आणि शब्दकोश आहे.तसेच माहितीचा  खजिना असून,विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ आहे.एक विद्यार्थी या नात्याने पत्रकार उत्तम बोडखे यांनी सरांचा विद्यार्थी म्हणून वावरताना आणि आज एक छोटा सहकारी म्हणून पत्रकारितेचे धडे घेत असताना मिळालेल्या ज्ञानाची शिदोरी म्हणून हा ग्रंथ संपादन करीत असताना,मनस्वी किती आनंद होतो आहे,या विषयीच्या भावना मोजक्या शब्दात व्यक्त केलेल्या आहेत. मलपृष्ठावर गुरुवर्य अनंत हंबर्डे यांनी या ग्रंथ प्रकाशनाबद्दल आत्मीयतेने,तळमळीने ज्यांनी ज्यांनी हा अग्रलेख संग्रहाचा ग्रंथ प्रकाशित व्हावा,अशा सहृदयी भावना व्यक्त केल्या,त्यांचा आवर्जून नामोल्लेख केलेला आहे.मोजक्या शब्दात त्यांनी अनंत ऋणी या शीर्षकात जे सांगितले ते असे... मराठी  सारस्वत सिंधू मधला मी एक बिंदू आहे. साहित्यिकांच्या दिंडीतील खांदी पताका, गळ्यात माळ आणि हाती टाळ असलेला अनवाणी मी वारकरी आहे.सुमारे पंचावन्न वर्षापासून अक्षरांचे शब्द जुळवीत आहे. सुरुवातीला काही कथा लिहिल्या,एल्गार नावाचे एक नाटक लिहिले,कविता लिहिल्या, पण मला उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नामदार नरेंद्रजी चपळगावकर नाना ह्यानी लेख लिहिण्याचे सांगितले.तिथून पुढे तसे जमले तसे लेख लिहितो आहे.बीडचे झुंजार नेता,चंपावतीपत्र,सुराज्य,प्रजापत्र,संकेत, पार्श्वभूमी ह्या वृत्तपत्रांनी लेख छापले.






 पंचधारा,प्रतिष्ठान,महानुभाव,ज्ञानोदय, सकाळ,लोकसत्ता,लोकमत या वृत्तपत्रांनी प्रासंगिक लेख आवर्जून छापले.सुमारे अडीच हजारांच्या आसपास लेख प्रसिद्ध झाले आहेत.दैनिक मराठवाडा माझे ऊर्जास्रोत होते.विचार प्रवृत्तीय लेख लिहिणाऱ्या शिवरामपंत परांजपे,कोल्हटकर, माडखोलकर,महाजनी,आगरकर,आचार्य अत्रे,परुळेकर,कृष्णाजी खाडिलकर,अनंत भालेराव इत्यादी संपादकांच्या मांदियाळीचा मात्र मी एक भारवाहक आहे.गुरुवर्य अनंत हंबर्डे हे अग्रलेखाचे बादशाह आहेत.अग्रलेखाचे विद्यापीठ आहे.पण त्यांची नम्रता इतकी,स्वतःला ते भारवाहक म्हणतात.संपादक उत्तम बोडखे,संग्राहक नामदेव भाऊ राऊत,आणि उत्तम मार्गदर्शक ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्रबुद्धे या त्रिवेणी विचारातून साकारलेला हा अग्रलेख संग्रह ग्रंथ अनंत तरंग वाचकांना पुन्हा पुन्हा वाचावासा वाटेल.असे मला वाटते.            .

...........................   प्रा.सय्यद अल्लाउद्दीन

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.